लंडन – विख्यात वैद्यकीय जर्नल म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘द लँसेट मेडिकल जर्नल’ने दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनच्या ‘ऑक्सफर्ड विद्यापीठा’तील शास्त्रज्ञांना कोरोनाव्हायरसवरील लसीच्या पहिल्या मानवी चाचणीत यश मिळाले आहे. ही लस मानवी शरीरात कोरोनाव्हायरस विरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करते, असेही ‘द लँसेट’ने म्हटले आहे. जगभरातील कोरोनाव्हायरसच्या फैलावामुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणात ऑक्सफर्डची बातमी दिलासादायक ठरत आहे. दरम्यान, जगभरात चोवीस तासात कोरोनाचे अडीच लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत.
ऑक्सफर्ड विद्यापीठाने एप्रिल आणि मे महिन्याच्या दरम्यान ब्रिटनमधील सुमारे १०७७ जणांना या लसीचे डोस दिले होते. सुमारे १८ ते ५५ वर्षे वयोगटातील व्यक्तींवर ही चाचणी घेण्यात आली होती, अशी माहिती ‘लँसेट’ने दिली. सुमारे ५६ दिवसांच्या परीक्षणानंतर ही लस शरीरामध्ये अँटीबॉडी आणि टी-सेल्स तयार करण्यात मदत करते. यापैकी टी-सेल्स कोरोनाव्हायरस विरोधात लढण्यासाठी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती तयार करतात, असे सदर वैद्यकीय जर्नलमध्ये म्हटले आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाला मानवी चाचणीतील या पहिल्या परीक्षणात मिळालेल्या यशासाठी समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीनंतरच सर्व चित्र स्पष्ट होईल, असेही या वैद्यकीय जर्नलच्या काही अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे कोरोनाव्हायरसचा जगभरातील फैलाव वाढतच चालला असून गेल्या चोवीस तासात या साथीच्या २,५९,८४८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने ही माहिती उघड केली. एकाच दिवसात अडीच लाखाहून अधिक रुग्ण सापडण्याची ही पहिलीच घटना ठरते, असे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने प्रसिद्ध केले. यापैकी ६३,८७२ रुग्ण एकट्या अमेरिकेतच आहेत. सलग सहाव्या दिवशी अमेरिकेत या साथीचे ६० हजाराहून अधिक रुग्ण सापडले आहेत. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये या साथीच्या चाळीस हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याबरोबरच जगभरातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या दीड कोटीच्या जवळ पोहोचली आहे.