सौदीचे कर्ज फेडण्यासाठी पाकिस्तानने चीनकडून कर्ज घेतले

सौदीचे कर्जबीजिंग – सौदी अरेबियाने दिलेल्या दोन अब्ज डॉलर्सच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी पाकिस्तानने पुन्हा एकदा चीनसमोर हात पसरले आहेत. पाकिस्तानातील आघाडीच्या वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, चीनने पाकिस्तानला 1.5 अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले आहे. पाकिस्तान आणि चीनच्या मध्यवर्ती बँकांमध्ये झालेल्या कराराअंतर्गत हे कर्ज देण्यात आले आहे. त्यामुळे या कर्जाचा बोजा पाकिस्तानच्या जनतेवर पडणार नाही, असा अजब दावा पाकिस्तानच्या वर्तमानपत्राने केला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी याआधी सौदी अरेबियाचा दौरा करून तीन वर्षांसाठी 6.2 अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले होते. यामध्ये तीन अब्ज डॉलर्सच्या आर्थिक सहाय्याचा तर 3.2 अब्ज डॉलर्सच्या इंधनविषयक सहाय्याचा समावेश होता. पण तुर्की व इराणशी जवळीक साधून इस्लामी देशांची स्वतंत्र संघटना स्थापन करण्याच्या आणि त्याचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानला सौदी अरेबियाने जबर झटका दिला.

सौदीचे कर्ज

सौदी अरेबियाने पाकिस्तानला दिलेल्या कर्जाची तातडीने परतफेड करण्याची मागणी केली. त्याचबरोबर पाकिस्तानला देण्यात येणारे इंधनविषयक सहाय्य देखील रोखले. सौदीच्या या निर्णयामुळे पाकिस्तानची कोंडी झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी पाकिस्तानने महिन्याभरापूर्वी चीनकडून एक अब्ज डॉलर्सचे कर्ज घेऊन सौदीला त्याची परतफेड केली होती. त्यानंतर पाकिस्तानने सौदीला उर्वरित कर्जाच्या परतफेडीसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. पण सौदीने ही मागणी फेटाळल्यामुळे पाकिस्तानने अधिकच संकटात सापडला आहे.

सौदीचे उर्वरित दोन अब्ज डॉलर्सचे कर्ज पाकिस्तानला जानेवारी महिन्यापर्यंत चुकते करणे आवश्‍यक आहे. सौदीच्या या दोन अब्ज डॉलर्सच्या कर्जासाठी पाकिस्तानने चीनकडे नव्या कर्जाची मागणी केली. चीनने पाकिस्तानची मागणी मान्य करून 1.5 अब्ज डॉलर्सचे कर्ज पुरविल्याचे पाकिस्तानच्या वर्तमानपत्राने म्हटले आहे. यापैकी एक अब्ज डॉलर्स सोमवारी सौदीला देण्यात येतीले. तर सौदीचे उर्वरित एक अब्ज डॉलर्स जानेवारी महिन्यात फेडले जातील, असे पाकिस्तानी वर्तमानपत्राचे म्हणणे आहे.

सौदीचे कर्जतसेच ‘स्टेट बँक ऑफ पाकिस्तान’ आणि ‘पिपल्स बँक ऑफ चायना’ या दोन बँकांमध्ये 2011 साली झालेल्या ‘करन्सी स्वॅप एग्रीमेंट’च्या (सीएसए) पार्श्‍वभूमीवर, चीनने पाकिस्तानला हे कर्ज पुरविले आहे. पाकिस्तानच्या जनतेवर हे कर्ज लादलेले नाही, असा काहीसा विचित्र खुलासा सदर पाकिस्तानी वर्तमानपत्राने दिला. पण पाकिस्तानातील विश्‍लेषक व वृत्तवाहिन्या यावर टीका करीत आहेत.

‘चायना-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर’ अंतर्गत आवश्‍यक असणाऱ्या प्रकल्पांना कर्ज पुरविण्यासाठी दोन्ही देशांच्या बँकांमध्ये ‘सीएसए’ पार पडला होता. पाकिस्तानने याआधीच सदर कराराअंतर्गत अब्जावधी डॉलर्सचे कर्ज घेतले आहे. या कर्जाचे व्याज म्हणून पाकिस्तानने चिनी बँकेला तब्बल 20 अब्ज पाकिस्तानी रुपये चुकते केले आहेत. अशा परिस्थितीत इतर देशांचे कर्ज फेडण्यासाठी सदर करारांतर्गत कर्ज उचलणे पाकिस्तानला आणखीन दिवाळखोरीकडे ढकलेल, असा इशारा पाकिस्तानी विश्‍लेषक देत आहेत.

त्याचबरोबर सौदीकडून घेतलेल्या आर्थिक सहाय्याव्यतिरिक्त इंधने बिल देखील पाकिस्तानला चुकते करायचे आहे, याची आठवणही पाकिस्तानी विश्‍लेषक करुन देत आहेत. तर जी-20चा अध्यक्ष असलेला सौदी येत्या काळात सदर संघटनेने पाकिस्तानला कोरोनाच्या साथीसाठी दिलेल्या कर्जाबाबतही विचारणा करू शकतो, हे विसरता कामा नये, असा इशारा पाकिस्तानी विश्‍लेषक देत आहेत. सौदी व्यतिरिक्त संयुक्त अरब अमिरातीने देखील पाकिस्तानकडे कर्जाच्या परतफेडीची मागणी केली होती.

त्यामुळे पाकिस्तान चीनच्या कर्जाच्या सापळ्यात पूर्णपणे अडकला असून आपला देश रसातळाला चालल्याची चिंता पाकिस्तानचे विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत.

leave a reply