नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर ‘अॅन्टी टनेलिंग ऑपरेशन’दरम्यान सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी तयार केलेले आणखी एक भूयार शोधले आहे. हे भूयार अद्ययावत असून ३० फुट खोल आणि दीडशे मिटर लांब आहे. गेल्या दहा दिवसात दुसरे, तर गेल्या सहा महिन्यात आंतरराष्ट्रीय सीमा रेषेवर सापडलेले हे चौथे भूयार आहे.
नियंत्रण रेषेवर सतत्याने घुसखोरीचे प्रयत्न करणार्या पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून आंतरराष्ट्रीय सीमेवरूनही घुसखोरीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. आतंररराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीसाठी भूयारांचा वापर होत असल्याचे बीएसएफच्या लक्षात आले होते. याआधी पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीतही याची माहिती मिळाली होती. यानंतर बीएसएफने सहा महिन्यांपूर्वी ‘अॅन्टी टनेलिंग ऑपरेशन’ हाती घेतले. भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर कुंपणाला लागून असलेल्या भागांमध्ये बारकाईने चाचपणी केली जात असून भूयारांचा शोध घेतला जात आहे.
नवे भूयार कथुवामधील हिरानगर सेक्टरमध्ये पानसर भागात सापडले आहे. हे भूयार १५० मीटर लांब असून तीन फूट व्यासाचे आहे. तसेच जमिनीत ३० फूट खोल खणण्यात आले आहे. भूयाराची रचना पाहता हे भूयार पाकिस्तानी खणण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांना सहाय्य केल्याचे स्पष्ट होते. या भूयाराचा शोध लागल्याने घुसखोरीचा मोठा डाव उधळला गेला आहे.
गेल्या दहा दिवसात हिरानगर सेक्टरमध्ये सापडलेले हे दुसरे भूयार आहे. याआधी १३ जानेवारीला बोबियान गावाजवळ १५० मीटर लांब भूयार शोधून काढण्यात आले होते. या भूयारात पाकिस्तानच्या कराचीमधील दुकानाचा मार्क असलेली रेतीची पोतीही सापडली होती. गेल्या सहा महिन्यात आढळलेल्या इतर दोन भूयारांमध्येही यामध्ये पाकिस्तानच्या लष्कराचा हात असल्याचे पुरावे सापडले होते.
सध्या पाकिस्तानसाठी नियंत्रण रेषेवरुन दहशतवाद्यांची घुसखोरी करणे फारच कठीण झाले आहे. नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराने गस्त वाढविली आहेत. तसेच दहशतवाद्यांच्या घुसखोरीत सहाय्यासाठी पाकिस्तान करीत असलेल्या गोळीबाराला सडेतोड प्रत्युत्तर भारताकडून दिले जात आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यावर पाकिस्तानला या ठिकाणी दहशतवादी कारवाया करून जागतिक समूदायाचे जम्मू-काश्मीरकडे वळवायचे होते. मात्र पाकिस्तानचे हे प्रयत्न हाणून पडल्याने पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. आता भारतात दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी आंतरराष्ट्रीय सीमेवरूनही प्रयत्न वाढल्याचे लक्षात येत आहे. यासाठी अशा भूयारांचा वापर केला जातो. कथुवामध्ये नवे भूयार सापडलेल्या भागातच गेल्यावर्षी शस्त्र तस्करी करणारे पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात आले होते. तसेच २०१९ मध्ये या भागात घुसखोरीचा मोठा प्रयत्न उधळण्यात आला होता.