नवी दिल्ली/इस्लामाबाद – पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या तालिबानी राजवटीला पत्र लिहून आंतरराष्ट्रीय दहशतवादी असलेल्या मसूद अझहरला पकडण्याची सूचना केल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानने या पत्रात अझहर हा अफगाणिस्तानात लपला असल्याचा दावा केला आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांचा पाठिराखा व पोषणकर्ता असल्याचा ठपका ठेवून ‘फायनान्शिअल ॲक्शन टास्क फोर्स’ने (एफएटीए) पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकले आहे. गेल्या दोन वर्षांपासून एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये असलेला पाकिस्तान यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असून यासाठी पाकिस्तानने खेळलेला हा नवा डाव असू शकतो, असा दावा काही तज्ज्ञ करीत आहेत.
भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडविणाऱ्या मौलाना मसूद अझहरला संयुक्त राष्ट्राने २०१९ साली आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले होते. पाकिस्तानातून कारवाया करणाऱ्या मसूद अझहरला दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव याआधी चीनने अनेक वेळा रोखला होता. मात्र आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत आल्यावर पाकिस्तानवर अझहरवरील कारवाईचे दडपण वाढले होते. त्यातच पाकिस्तान ग्रे लिस्टमध्ये गेल्याने पाकिस्तानसाठी अझहरवरील कारवाई आवश्यक बनली होती. पण ही कारवाई करणे पाकिस्तानसाठी अवघड काम होते. या पार्श्वभूमीवर अझहर अचानक गायब झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. गेल्या दीड दोन वर्षांपासून अझहरचा थांगपत्ता लागत नसल्याचे दावे केले जात होते. मात्र त्याला पाकिस्तानी लष्करानेच सेफ हाऊसमध्ये ठेवल्याचे आरोप भारतीय विश्लेषक करीत होते.
नुकताच ‘एफएटीएफ’च्या पथकाने पाकिस्तानचा दौरा केला होता. दहशतवाद्यांवर कारवाई व अर्थसहाय्यासंदर्भात ‘एफएटीएफ’ने केलेल्या ३८ सूचनांवर पाकिस्तान प्रयत्न करीत असल्याचे या पथकाने आपल्या अहवालात म्हटल्याचे बातम्या आल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तान ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्याची शक्यता वर्तविली जात होती. पण एफएटीएफच्या आणखी एका अहवालात एफएटीएफने दहशतवाद्यांच्या फंडिंगला रोखण्यासाठी घातलेल्या ११ आंतरराष्ट्रीय नियमांपैकी १० नियमांवर पाकिस्तान सपशेल फेल ठरल्याची बातमीही आली आहे. त्यामुळे पाकिस्तानला ग्रे लिस्टमधून बाहेर पडणे तितके सोपे नसेल. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने मसूद अझहर अफगाणिस्तानात लपल्याचा दावा केला आहे. अझहर हा अफगाणिस्तानच्या नांगरहार भागात असल्याचा दावा पाकिस्तानने केला असून अफगाणिस्तानच्या तालिबानी राजवटीला अझहरला पकडण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र मसूद अझहर सारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांवर कारवाई न करण्याबाबतचा आपल्यावरील ठपका दूर करण्यासाठी पाकिस्तानने ही खेळी केल्याचा दावा केला जात आहे.