इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये भीषण पुरानंतर दुसरी आपत्ती डोके वर काढत आहे. पाकिस्तानमध्ये रोगराईची लाट येईल आणि यात अनेकांचा बळी जाईल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. मुख्य म्हणजे ही साथ रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या औषधांचा साठा व वैद्यकीय सुविधा पाकिस्तानकडे नाहीत. त्यामुळे येत्या काळात आपल्या देशाची भयंकर अवस्था बनेल, अशी चिंता पाकिस्तानची माध्यमे व्यक्त करीत आहेत. या पूराचा भयंकर फटका १.६ कोटी मुलांना बसला असून यातील ३० लाखांहून अधिक मुलांकडे तातडीने लक्ष देणे अत्यावश्यक असल्याचे संयुक्त राष्ट्रसघांने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
पाकिस्तानला आलेल्या पुरात आतापर्यंत १५०० हून अधिक जणांचा बळी गेला. एक तृतीयांश भाग पुराच्या पाण्याखाली गेला होता. यामुळे पाकिस्तानसमोर एक नाही, तर एकाच वेळी अनेक संकटे खडी ठाकली आहेत. पूराचे पाणी आता ओसरू लागले असून यामुळे रोगराई वाढण्याची दाट शक्यता समोर येत आहे. त्यातच अन्नटंचाईने पाकिस्तानला ग्रासले असून पूरग्रस्तांची अवस्था दयनीय बनली आहे, असे पाकिस्तानचीच माध्यमे सांगत आहेत. त्यातच औषधांचा अपुरा साठा हे पाकिस्तानसमोरील आणखी एक संकट ठरत असून यातून देशाला बाहेर काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून मदत मिळेल, या आशेवर पाकिस्तान दिवस ढकलत आहे.
पाकिस्तानाताला पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. इथल्या नागरिकांना अस्वच्छ पाणी मिळत आहे. यामुळे कॉलरासारखी साथ पसरण्याची भिती डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रास घेब्रेस्यूएस यांनी व्यक्त केली. पाकिस्तानमध्ये ठिकठिकाणी पाण्याचे डबकी तयार झाली आहेत. यातून डासांची पैदास होऊन पाकिस्तानमध्ये मलेरिया आणि डेंग्यूची साथ थैमान घालू शकते, असा इशारा घेब्रेस्यूएस यांनी दिला आहे. पाकिस्तानातल्या गर्भवती अत्यंत बकाल अवस्थेत मुलांना जन्म देत आहेत, याकडे घेब्रेस्यूएस यांनी लक्ष वेधले.
पाकिस्तानच्या या पुरात जवळपास दोन हजारहून अधिक आरोग्य केंद्रे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या आरोग्य कर्मचाऱ्यांवरही मर्यादा आल्या आहेत. अशा परिस्थितीत संयुक्त राष्ट्रसंघ आणि काही स्वयंसेवी संस्थांनी पाकिस्तानमध्ये तात्पुरते आरोग्य केंद्र उभारले आहेत. त्या ठिकाणी रुग्णांवर उपचार होत आहेत.
दरम्यान, पाकिस्तानच्या या पुराचा फटका १.६ कोटी मुलांना बसला आहे. यातील तीस लाखांहून अधिक मुलांना तातडीने अत्यावश्यक औषधे उपलब्ध करुन द्यायला हवीत, असे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे. सिंध प्रांतात या पुराने ५२८ मुलांचा बळी घेतला आहे. त्यात आधीच कुपोषित असलेल्या मुलांना आता विविध आजारांनी ग्रासायला सुरुवात झाल्याचेही संयुक्त राष्ट्रसंघाने पुढे स्पष्ट केले. वेळीच आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य मिळाले नाही तर पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर मुलांचा बळी जाईल, अशी भिती संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केली आहे.
पण अशा स्थितीतही पाकिस्तानचे अंतर्गत राजकारण संपलेले नाहीत. भारतासारखा शेजारी देश मागणी केल्यास सहजपणे पाकिस्तानला आवश्यक असलेले अन्नधान्य व औषधांचा पुरवठा करू शकतो. पण आपली जनता अन्नान दशेत असताना देखील पाकिस्तानने भारताकडे ही मागणी केलेली नाही. पाकिस्तानात टॉमेटोची कमतरता असताना, इराणने पाठविलेले टॉमेटो या देशातील काहीजण रस्त्यावर फेकून देत असल्याची व्हिडिओज् व्हायरल झाले होते. त्यामुळे भारतातून आलेल्या सहाय्याचे पाकिस्तानाच असेच ‘स्वागत’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इतकी जहरी विचारसरणी खोलवर रूजलेल्या या देशाने मागणी केल्याखेरीज भारताने कुठल्याही स्वरुपाचे सहाय्य पुरवू नये, असे भारतीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानात आलेल्या पूरानंतर खेद व्यक्त केला होता. त्यानंतर पाकिस्तानातील काही बुद्धिमंत व पत्रकारांनी भारताने आपल्या देशाला सहाय्य करावे, अशी मागणी उचलून धरली होती. पण हे सहाय्य स्वीकारण्याची क्षमता आपल्याकडे नाही, हे पाकिस्तानने पुन्हा एकदा दाखविले आहे. चीन व आखाती क्षेत्रातील आपले मित्रदेश भरीव सहाय्य करतील आणि आपल्याला या संकटातून बाहेर काढतील, असे भारतद्वेष्ट्या पाकिस्तानी विश्लेषकांना वाटत आहे. पण अशा खडतर प्रसंगी चीनने पाकिस्तानकडे पाठ फिरवली असून आखाती देश देखील पाकिस्तानला वारंवार सहाय्य पुरवून वैतागले आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आपल्याला इतर देशांकडे भीक मागावी लागते, असे सांगून त्यावर खंत व्यक्त करीत आहेत. तर स्वतःलाच भिकारी म्हणविणारा हा पंतप्रधान देशाचे काय भले करणार, अशी टीका विरोधी पक्षाचे नेते करीत आहेत. यामुळे पूर व पूराशी निगडीत असलेल्या समस्यांबरोबरच अन्नधान्य व औषधांची टंचाई यांच्यासह तीव्र राजकीय मतभेद ही देखील पाकिस्तानसमोर खडी ठाकलेली भयंकर समस्या ठरते आहे. यामुळे इच्छा असून पाकिस्तानच्या सरकारला भारताकडून आवश्यक ते सहाय्य घेणे अशक्य बनले आहे. याचे विदारक परिणाम पाकिस्तानच्या जनतेला भोगावे लागत आहेत. हा देश अशा स्थितीत फार काळ तग धरू शकणार नाही, असा इशारा काही जबाबदार विश्लेषकांनी दिला आहे.