पाकिस्तान युक्रेनला अणुबॉम्बचे तंत्रज्ञान पुरवित आहे

रशियन डिफेन्स कमिटीच्या सदस्यांचा आरोप

मॉस्को – पाकिस्तानकडून युक्रेनला अणुबॉम्बचे तंत्रज्ञान पुरविण्याची तयारी करीत असल्याचा गंभीर आरोप रशियाच्या ‘डिफेन्स कमिटी’चे सदस्य इगोर मोरोझोव्ह यांनी केला. युक्रेनच्या संशोधकांनी यासाठी पाकिस्तानला भेट दिली होती, अशी माहिती देखील मोरोझोव्ह यांनी रशियन माध्यमांना दिली. यानंतर पाकिस्तानात अस्वस्थता पसरली असून या प्रकरणी पाकिस्तानने रशियाकडे स्पष्टीकरण मागितले आहे. पाकिस्तानकडून युक्रेनी लष्कराला सहाय्य पुरविले जात असल्याच्या बातम्या याआधीच प्रसिद्ध झाल्या होत्या. पण मोरोझोव्ह यांनी पाकिस्तानवर याहूनही अधिक गंभीर आरोप केला आहे.

morozovपाकिस्तान अणुतंत्रज्ञान आणि आण्विक साहित्याची तस्करी करीत असल्याची बाब पुराव्यानिशी सिद्ध झाली होती. पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाचे कर्तेधर्ते असलेले डॉ. ए. क्यू. खान यांनी याची जाहीर कबुली देऊन यासाठी माफी देखील मागितली होती. मात्र कालांतराने ए. क्यू खान यांनी पाकिस्तानच्या सरकारने केलेला गुन्हा आपण आपल्या शीरावर घेऊन देशाला वाचविल्याचे म्हटले होते. त्यामुळे पाकिस्तान अण्वस्त्रप्रसारबंदीच्या विरोधातील कारवायांमध्ये फार आधीपासून गुंतलेला असल्याचे जगजाहीर झाले होते.

अशा परिस्थितीत रशियाबरोबर युद्ध सुरू असलेल्या युक्रेनसारख्या देशाला अणुबॉम्बचे तंत्रज्ञान पुरविण्यासंदर्भात पाकिस्तानवर झालेला आरोप अधिक गंभीर ठरतो. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानचे उद्योजक मोहम्मद झऊर यांनी स्वखर्चाने युक्रेनी लष्करासाठी दोन लढाऊ विमाने खरेदी केली होती. त्यावरही रशियातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अशारितीने पाकिस्तान युक्रेनला लष्करी सहाय्य पुरवित असून या सहाय्याबाबतच्या बऱ्याच गोष्टी अजूनही जगासमोर आलेल्या नाहीत, असे संकेत रशियाकडून दिले जात आहेत.

मात्र अणुबॉम्बच्या संदर्भात पाकिस्तान युक्रेनला करीत असलेल्या सहाय्याचे अधिक भीषण परिणाम पाकिस्तानला सहन करावे लागणार आहेत. सध्या अमेरिकेच्या इशाऱ्यावरून पाकिस्तानच्या लष्कराला हे काम करावे लागत असल्याची दाट शक्यता आहे. मात्र त्याचे भयावह परिणाम पाकिस्तानला भोगावेच लागतील, असे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

leave a reply