पाकिस्तानच्या लष्कराकडून पंतप्रधान इम्रान खान यांच्या मुसक्या आवळण्याची तयारी

इस्लामाबाद – आपले सरकार पाडण्यासाठी आंतरराष्ट्रीय कट शिजला असून पाकिस्तानचे विरोधी पक्ष या कारस्थानात सहभागी झाले आहेत, असा आरोप पंतप्रधान इम्रान खान यांनी केला होता. रविवारी राजधानी इस्लामाबादमधील जाहीर सभेत हा आरोप करून त्यांनी याचे तथाकथित पुरावे देणारे पत्र देखील दाखविले होते. बुधवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करून इम्रान खान हे पत्र सादर करून आपल्या विरोधातील कटाची माहिती उघड करणार होते. मात्र पाकिस्तानचे लष्कर आणि न्यायालयाने इम्रान खान यांना रोखले आहे. गोपनीयतेच्या कायद्यावर बोट ठेवून इम्रान खान यांना तसे करता येणार नाही, असा इशारा न्यायालयाने दिला आहे. तर पाकिस्तानच्या लष्कराने इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे काही तासात इम्रान खान पंतप्रधापदावरून खाली खेचले जातील, असे दिसू लागले आहे.

पंतप्रधान इम्रान खानगेल्याच आठवड्यात पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा व इतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी इम्रान खान यांना राजीनाम्याची सूचना दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पाकिस्तानी संसदेचे सत्र सुरू होण्यापूर्वी खान यांनी राजीनामा द्यावा, असे लष्कराने बजावले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष पंतप्रधान खान यांनी आपले पद टिकविण्यासाठी संघर्षाचा पवित्रा घेतला. रविवारी राजधानी इस्लामाबादमध्ये आपल्या पक्षाचा मोठा मेळावा आयोजित करून आपण पाकिस्तानसाठी लढाई लढत असल्याचा दावा केला. मात्र खान यांच्या या कारवायांमुळे लष्कर अधिकच भडकले असून विरोधी पक्षही आक्रमक बनले आहेत.

पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या पक्षाला बहुमत नसून हे सरकार सहा छोट्या पक्षांच्या समर्थनावर टिकून आहे. यापैकी ‘मुताहिदा कौमी मुव्हमेंट’ (एमक्यूएम) व ‘बलोचिस्तान अवामी पार्टी’ (बीएपी) या दोन्ही पक्षांनी समर्थन काढून घेतले आहे. यामुळे इम्रान खान यांचे सरकार अल्पमतात आले आहे. तर त्यांच्या सराकरमधील काही मंत्र्यांनी राजीनामा देऊन इम्रान खान यांच्यासमोरील संकट अधिकच वाढविले आहे. अशा परिस्थितीत इम्रान खान यांनी आपल्या विरोधात आंतरराष्ट्रीय कट आखण्यात आल्याचे सांगून जनतेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला.

आपल्या विरोधातील नेते तसेच लष्करप्रमुख देखील या आंतरराष्ट्रीय कटात सहभागी असल्याचे संकेत इम्रान खान देत होते. बुधवारी पत्रकार परिषदेत ते याबाबत मोठे दावे करणार होते. पण पाकिस्तानी लष्कर तसेच न्यायालयाने तसे होऊ दिले नाही. इम्रान खान यांना लवकरच पदावरून खाली खेचण्याची तयारी पाकिस्तानच्या लष्कराने केली आहे. काही तासातच ही प्रक्रिया पूर्ण होईल, असा दावा केला जातो.

leave a reply