श्रीनगर – पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये ‘अल-बद्र’ या दहशतवादी संघटनेला पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी म्हटले आहे. पाकिस्तानकडून काश्मीर खोऱ्यात ‘द रेजिस्टेंस फ्रन्ट’ (टीआरएफ) नावाच्या संघटनेला सक्रिय करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यात ‘टीआरएफ’कडून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडविण्यात आले आहेत. ‘टीआरएफ’ आणि ‘अल-बद्र’ संघटनांना सक्रिय करून पाकिस्तान जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवाया या स्थानिकांकडूनच केल्या जात असल्याचे चित्र निर्माण करू पाहत असल्याचे दिलबाग सिंग म्हणाले.
सोमवारी ‘टीआरएफ’च्या दहशतवाद्यांनी अनंतनाग जिल्ह्यातील लालकिपुरा भागात एका सरपंचाची गोळी मारून हत्या केली. ‘लश्कर-ए-तोयबा’, ‘जैश ए मोहम्मद’ आणि ‘हजबुल मुजाहिद्दीन’च्या दहशतवाद्यांचा समावेश असलेल्या ‘टीआरएफ’च्या काश्मीर खोऱ्यातील हालचाली वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी ‘टीआरएफ’ म्हणजे ‘टेररिस्ट रिवायव्हल फ्रन्ट’ असे म्हटले होते. मंगळवारी काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी ‘टीआरएफ’ बनविल्यावर गेल्या काही महिन्यांपासून अल-बद्र संघटनेला पुन्हा उभे करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.
‘अल-बद्र’ या संघटनेचे अस्तित्व जम्मू-काश्मीरमधून संपले होते. मात्र आता ‘टीआरएफ’ ही नवी संघटना सक्रिय केल्यावर ‘अल-बद्र’ला पुनर्जीवित करण्याच्या हालचाली या पाकिस्तानच्या व्यापक कटाचा भाग ठरतात आणि याकडे सुरक्षादल बारकाईने लक्ष ठेवून आहेत, असे दिलबाग सिंग म्हणाले. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांना बळ पुरवून पाकिस्तान जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया या स्थानिकांकडून केल्या जात असल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी स्थानिक तरूणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र काश्मिरी जनतेबरोबर समन्वयाने या प्रयत्नांना उधळून लावण्यात येत आहे, असे जम्मू-काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी म्हटले आहे.