जम्मू-काश्मीरमधील दोन जलविद्युत प्रकल्पांवर पाकिस्तानचा आक्षेप

इस्लामाबाद – जम्मू-काश्मीरच्या चिनाब नदीवर उभारण्यात येणार्‍या ‘लोअर कलनई’ आणि ‘पकाल डल’ या दोन जलविद्युत प्रकल्पांवर पाकिस्तानने आक्षेप घेतला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जाहिद चौधरी यांनी भारताकडे या जलविद्युत प्रकल्पांबाबतचे आक्षेप कळविल्याची माहिती दिली. पुढील आठवड्यात ‘सिंधु आयोगा’ची बैठक दिल्लीत पार पडणार आहे. यासाठी पाकिस्तानचे एक शिष्टमंडळ भारतात येणार आहे. त्याआधी पाकिस्तानकडून हे आक्षेप घेण्यात आले आहेत.

भारताकडून जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये चिनाब, झेलम सारख्या नद्या व त्यांच्या उपनद्यांवर जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येत आहेत. पाकिस्तानने यातील काही प्रकल्पांवर याआधीही आक्षेप घेतले होते. याविरोधात पाकिस्तानने वर्ल्ड बँकेकडे, तसेच आंतरराष्ट्रीय लवादाकडेही धाव घेतली होती. मात्र भारत उभारत असलेले प्रकल्प दोन्ही देशांमध्ये झालेल्या ‘सिंधू जलवाटप करारा’ला धरूनच असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

आता ‘लोअर कलनई’ आणि ‘पकाल डल’ या दोन प्रकल्पांवर सिंधू आयोगाच्या बैठकीआधी पाकिस्तानने आक्षेप घेतला आहे. १९६० साली भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या ‘सिंधू जलवाटप करारा’नुसार दरवर्षी एकदातरी सिंधू आयोगाची बैठक होणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे ही बैठक २५ मार्च रोजी पार पडणार आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘लोअर कलनई’ आणि ‘पकाल डल’ हे दोन्ही प्रकल्प म्हणजे पाकिस्तानचे पाणी अडविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे.

हे ‘सिंधू जलवाटप करारा’चे उल्लंघन ठरते. पाकिस्तानला त्यांच्या वाटणीचे पाणी मिळायला हवे, असे पाकिस्तानच्या परराष्ट ्रमंत्रालयाचे प्रवक्ते जाहिद चौधरी यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उकरून काढला. भारताबरोबरील सर्व वाद शांततेच्या मार्गाने सोडविण्याचा पाकिस्तानचा नेहमी प्रयत्न राहिला आहे. यामध्ये जम्मू-काश्मीरचा मुद्दाही सामील असल्याचे चौधरी म्हणाले.

दरम्यान, भारताचा कोणताही प्रकल्प सिंधू जलवाटप कराराचे उल्लंघन करणारा नाही, हे वारंवार स्पष्ट झाले आहे. २०१६ साली जम्मू-काश्मीरमध्ये उरी येथे लष्करी तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्त आणि पाणी एकसाथ वाहू शकत नाही, असा इशारा दिला होता. तसेच यापुढे भारताच्या वाट्याचे पाणी पाकिस्तानात वाहून जाणार नाही, यादृष्टीने भारताने जम्मू-काश्मीरमधील नद्यांवर प्रकल्प हाती घेतले होते. त्यामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे.

भारतातून वाहत येणार्‍या नद्यांवर पाकिस्तानची शेती अवलंबून असून हे पाणी आटले तर पाकिस्तान रखरखीत वाळवंट बनेल, अशी भीती पाकिस्तानी तज्ज्ञांकडून वारंवार व्यक्त केली जाते.

leave a reply