इस्लामाबाद – तालिबानच्या राजवटीमुळे भयंकर मानवी आपत्तीत सापडलेल्या अफगाणी जनतेसाठी भारत पाठवित असलेले सहाय्य रोखण्याचा नादानपणा करणार्या पाकिस्तानच्या सरकारला याच्या परिणामांची जाणीव झाली आहे. म्हणूनच भारत अफगाणिस्तानला पाठवित असलेले सुमारे ५० हजार मेट्रिक टन इतक्या गव्हाच्या वाहतुकीसाठी मार्ग खुला करण्याची तयारी पाकिस्तानने दाखविली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान याला तयार झाल्याचे वृत्त पाकिस्तान रेडिओने दिले आहे. पाकिस्तानने तसा निर्णय घ्यावा, यासाठी तालिबानने दडपण टाकले होते, असा दावा केला जातो.
अफगाणिस्तानची जनता सध्या अन्नधान्याची टंचाई, महागाई व इतरही अनेक समस्यांचा सामना करीत आहे. आत्ताच्या काळात अफगाणी जनतेची उपासमार होत असून हिवाळ्यात या उपासमारीची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढेल, अशा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकार्यांनी दिला होता. हा इशारा येण्याच्याही आधी भारताने अफगाणी जनतेवरील हे संकट ओळखून सुमारे ५० हजार मेट्रिक टन इतका गहू अफगाणिस्तानला पाठविण्याची तयारी केली होती. त्यासाठी पाकिस्तानने आपला मार्ग खुला करावा, अशी विनंतीही भारताने केली.
गेल्या दशकभराच्या कालावधीत भारताने अफगणिस्तानच्या जनतेला सुमारे दहा लाख मेट्रिक टनाहून अधिक प्रमाणात गव्हाचा पुरवठा केला होता. गेल्या वर्षीच भारताने अफगाणिस्तानला सुमारे ७५ हजार मेट्रिक टन इतक गहू पुरविला होता. मात्र भारत अफगाणिस्तानला करीत असलेले हे मानवतावादी सहाय्य रोखण्याचा निर्णय पाकिस्तानने केला होता. या सहाय्यामुळे भारताचे अफगाणिस्तानबरोबरील संबंध दृढ होतील व तालिबानवरील भारताचा प्रभाव वाढेल, अशी चिंता पाकिस्तानला वाटत आहे. म्हणूनच पाकिस्तानने अफगाणी जनतेला मिळणारा हा गहू रोखल्याचे दिसत होते.
पण काही दिवसांपूर्वी तालिबानने परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्त केलेला अमिर खान मोत्ताकी याने पाकिस्तानला भेट दिली. या भेटीत त्याने भारत अफगाणिस्तानला पुरवित असलेल्या गव्हाचा मार्ग मोकळा करा, असे पाकिस्तानला सुनावले. यानंतर पाकिस्तानचे डोळे उघडले व आता इम्रान खान यासाठी तयार झाल्याचे दिसत आहे.