वॉशिंग्टन – अफगाणिस्तानचे लष्कर आणि तालिबानमधील संघर्ष तीव्र होत असून लाखो जण निर्वासित झाले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या संघटनेने अफगाणिस्तानातील या स्थितीवर चिंता व्यक्त केली. अशा परिस्थितीत, अफगाणिस्तानचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानने आपली सीमा मोकळी ठेवून निर्वासितांना प्रवेश द्यावा, अशी सूचना अमेरिकेने केली होती. पण पाकिस्तानने अफगाणी निर्वासितांना स्वीकारणार नसल्याचे सांगून अमेरिकेची नाराजी ओढावून घेतली आहे.
आठवड्यापूर्वी अमेरिकेने पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ आणि कुख्यात गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’चे प्रमुख फैझ हमीद यांना बोलावून घेतले होते. यावेळी अमेरिकेने पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना खडसावल्याचा दावा केला जातो. त्याचबरोबर अफगाणिस्तानातील संघर्षामुळे जीवाच्या भीतीने पलायन करणार्या निर्वासितांसाठी पाकिस्तानने आपली सीमा खुली ठेवावी, अशी सूचना अमेरिकेेच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली होती.
अफगाणिस्तानातील निर्वासितांना मर्यादित संख्येने स्वीकारण्यासाठी अमेरिका तयार आहे. पण त्याआधी पाकिस्तानने या निर्वासितांना आपल्या देशात स्वीकारून तुर्कीच्या मार्गाने अमेरिकेला रवाना करावे, असे अमेरिकेने सुचविले होते. या बैठकीत पाकिस्तानने कोणता निर्णय घेतला, याचे तपशील प्रसिद्ध झाले नाहीत. याआधी पाकिस्तानने अफगाणी निर्वासितांना स्वीकारले होते. पण पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी अमेरिकेची सूचना अमान्य केल्याच्या बातम्या येत आहेत.
‘अफगाणी निर्वासितांसाठी त्यांच्याच देशात व्यवस्था करावी. पाकिस्तान अधिक निर्वासितांना स्वीकारू शकत नाही’, असे युसूफ यांनी अमेरिकी वर्तमानपत्राला सांगितले. मोईद युसूफ यांनी केलेल्या या विधानांवर पाकिस्तानात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तालिबानसमर्थक आणि अमेरिकाविरोधी पत्रकारांनी युसूफ यांच्या भूमिकेचे स्वागत केले. तर पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी अशा गोष्टी माध्यमांसमोर बोलून आपल्या देशासमोरील अडचणी वाढविल्याची टीका विश्लेषक करीत आहेत.
अमेरिकेला लष्करी तळ देणार नाही, असे ठासून सांगणार्या पंतप्रधान इम्रान?खान यांना अमेरिकेच्या नाराजीचे किती भयंकर परिणाम होतील, याची कल्पनाच नसल्याची टीका पाकिस्तानी पत्रकार करीत आहेत. आता मोईद युसूफ यांनी देखील अमेरिकेला दुखावणारे दावे केले आहेत. याचे परिणाम लवकरच दिसू लागतील, अशी चिंता पाकिस्तानची माध्यमे व्यक्त करीत आहेत.