पाकिस्तान युरोपिय देशांचा गुलाम आहे का?

- पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा सवाल

इस्लामाबाद – आम्ही तुमचे गुलाम आहोत का? असा प्रश्‍न पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी युरोपिय देशांना केला आहे. युक्रेनवर हल्ला चढविणार्‍या रशियाच्या विरोधात मतदान करण्याचे पाकिस्तानने नाकारले होते. त्याची गंभीर दखल युरोपिय देशांनी घेऊन तब्बल २२ देशांच्या राजदूतांनी यावर पाकिस्तानला खडसावले. या देशांनी पत्र लिहून पाकिस्तानला यापुढे राष्ट्रसंघातील ठरावात रशियाच्या विरोधात मतदान करण्याची सूचना केली. त्यावर खवळलेल्या इम्रान खान यांनी युरोपिय महासंघाच्या सदस्यदेशांवरा आगपाखड केली. भारताला तुम्ही असे पत्र पाठविले आहे का? असा आणखी एक प्रश्‍न इम्रान खान यांनी विचारला आहे.

पाकिस्तान युरोपिय देशांचा गुलामरशियाने युक्रेनमध्ये युद्ध पुकारले त्यावेळी पंतप्रधान इम्रान खान रशियाच्या दौर्‍यावर होते. त्यांनी यावेळी रशियाला भेट देऊ नये, याचे विपरित परिणाम पाकिस्तानला सहन करावे लागतील, असा सल्ला बर्‍याचजणांनी दिला होता. पण अमेरिका व पाश्‍चिमात्य देश आपल्याला किंमत देत नसल्यामुळे संतापलेले इम्रान खान जाणीवपूर्वक रशियाच्या भेटीवर गेले. त्यानंतर अमेरिका व पाश्‍चिमात्य देशांनी पाकिस्तानला धमकावण्याचे सत्र सुरू केले होते.

अमेरिकेने पाकिस्तानच्या बँकेला दंड ठोठावला होता. तसेच युरोपिय देशांनीही पाकिस्तानला परिणामांची जाणीव करून दिली होती. यासाठी युरोपिय महासंघाच्या सदस्यदेशांनी पाकिस्तानला पत्र पाठविले होते. या पत्राची गंभीर दखल पाकिस्तानात घेण्यात आली. कारण युरोपिय देशांनी पाकिस्तानला धडा शिकविण्याचे ठरवले, तर आधीच संकटात असलेल्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

असे असूनही इम्रान खान यांनी भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाची नक्कल करण्याचा प्रयत्न केला. पण पाकिस्तान आणि भारताच्या क्षमतेत खूप मोठी तफावत आहे, हे इम्रान खान लक्षात घ्यायला तयार नाहीत. लवकरच अमेरिका व युरोपिय देश त्यांना याची जाणीव करून देतील, असे पाकिस्तानचे विश्‍लेषक सांगत आहेत.

leave a reply