इस्लामाबाद – पंतप्रधान इम्रान खान व राष्ट्रपती अरिफ अल्वी यांनी पाकिस्तानची संसद बरखास्त करण्याचे निर्णय घेतले खरे. मात्र त्यांची अंमलबजावणी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांवर अवलंबून असेल, असे पाकिस्तानचे सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांंनी जाहीर केले. आपण विरोधी पक्षांवर कुरघोडी केल्याचे दावे इम्रान खान व त्यांचे समर्थक करीत होेते. मात्र पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांनी केलेल्या या घोषणेमुळे चित्र पाटल्याचे दिसते आहे. मात्र या सार्या घडामोडींपेक्षाही इम्रान खान यांनी आपल्या विरोधातील आंतरराष्ट्रीय कारस्थानाबाबत केलेली विधाने पाकिस्तानात गदारोळ माजवित आहेत.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातील डोनाल्ड लू या अधिकार्याने माझे सरकार पाडण्यासाठी कारस्थाने आखली होती, असा आरोप इम्रान खान यांनी केला. पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत असाद मजिद यांना डोनाल्ड लू याने धमकावले होेते. इम्रान खान यांच्या सरकारविरोधातील अविश्वासदर्शक ठराव मंजूर झाला नाही व हे सरकार वाचले तर त्याचे भयंकर परिणाम होतील, असे या अमेरिकी अधिकार्याने राजदूत असाद मजिद यांना बजावले.
इम्रान खान यांनी हा आरोप केल्यानंतर पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये यावर जोरदार चर्चा सुरू झाली. जर अमेरिका इम्रान खान यांच्या विरोधात इतकी मोठी कारस्थाने करीत होती, तर मग त्यांनी आधीच याची माहिती देशाला का दिली नाही? असे प्रश्न विरोधी पक्षाचे नेते विचारत आहेत. इम्रान खान यांना सत्तेवरून खाली खेचण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, त्यावेळी इस्लामी देशांची ओआयसीची परिषदही पाकिस्तानात पार पडली. या परिषदेसाठी इम्रान खान यांच्या सरकारने अमेरिकेलाही आमंत्रण दिले होते, ते कशासाठी? असा प्रश्न विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी विचारला आहे.
आपले सरकार वाचविण्यासाठी इम्रान खान हा आंतरराष्ट्रीय कटाचा आरोप करीत असून त्यात काडीचेही तथ्य नसल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेले इम्रान खान पाकिस्तानच्या जनतेची सहानुभूती कमावण्यासाठी असे बेताल आरोप करीत सुटले आहेत. पण याचा त्यांना लाभ मिळू शकणार नाही, असे विरोधी पक्षाचे नेते ठासून सांगत आहेत. त्याचवेळी आपण एकटे देशभक्त असून इतर सारे देशद्रोही असल्याचे आरोप करणारे इम्रान खान फार मोठा अपराध करीत असल्याचे पाकिस्तानच्या माध्यमांचे म्हणणे आहे.
अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाकडे या देशाचे लक्ष लागले आहे. इम्रान खान व राष्ट्रपती अल्वी यांचे निर्णय न्यायालयाने फेटाळले, तर त्यांच्या सरकारला अविश्वासदर्शक ठरावाचा सामना करावा लागेल. किंवा त्याच्याही आधी इम्रान खान यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देणे भाग पडेल. एकदा का ते या पदावरून खाली उतरले की पाकिस्तानचे लष्कर इम्रान खान यांना त्यांची जागा दाखवून देईल, अशी चर्चाही पाकिस्तानात सुरू झाली आहे.