काबुल – तालिबानने ड्युरंड लाईनजवळ गस्त घालणार्या पाकिस्तानी लष्कराच्या हेलिकॉप्टरवर गोळीबार केल्याचे उघड झाले आहे. त्याच्या प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानच्या सीमेतील गावांवर गोळीबार केला होता. यानंतर तालिबानच्या मोटारी मोठ्या संख्येने ड्युरंड लाईनच्या दिशेने निघाल्याच्या बातम्या अफगाणी वृत्तसंस्था देत आहेत. देशात राजकीय अस्थैर्य माजलेले असताना ड्युरंड लाईनवरील हा तणाव पाकिस्तानसाठी घातक ठरू शकतो.
दोन दिवसांपूर्वी पाकिस्तान, अफगाणिस्तानसह इराणच्या सीमेला भिडलेल्या निमरोझ प्रांतात तालिबान आणि पाकिस्तानी लष्कर आमनेसामने आले होते. पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर ड्युरंड लाईनजवळ टेहळणीवर होते. सदर हेलिकॉप्टर ड्युरंड लाईनच्या अतिशय जवळ आल्यानंतर तालिबानने गोळीबार केला होता. यामध्ये पाकिस्तानी लष्कराचे जनरल पदावरील अधिकारी जखमी झाले असून हेलिकॉप्टरचे नुकसान झाले आहे. अफगाणिस्तानातील वृत्तवाहिनीने ही माहिती उघड केली.
यानंतर पाकिस्तानी लष्कराने ड्युरंड लाईनवरील अफगाणी गावांवर गोळीबार केला. यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पण अवघ्या काही तासात तालिबानच्या मोटारी ड्युरंड लाईनजवळील झाकीर गावाच्या दिशेने निघाल्याचे अफगाणी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले. आपल्या लष्करी अधिकार्याच्या हेलिकॉप्टरवर गोळीबार करणार्यांना आमच्या हवाली करा, अशी मागणी पाकिस्तानी लष्कराने तालिबानकडे केली. पण तालिबानने स्पष्ट शब्दात पाकिस्तानची ही मागणी धुडकावल्याचे स्थानिक पत्रकाराने सोशल मीडियावर म्हटले आहे.
अफगाण स्थित अमेरिकी पत्रकार हाशिम वाहदातयार यांनी ड्युरंड लाईनवर तालिबानने वाढविलेल्या तैनातीबाबत मोठी माहिती उघड केली. येत्या काळात तालिबान पाकिस्तानात हल्ला चढविल, असा दावा या पत्रकाराने केला. काही आठवड्यांपूर्वी तालिबानच्या काही कमांडर्सनी पाकिस्तानी जवानांसमोर खडे ठाकून तसा इशाराच दिला होता. तर तेहरिक-ए-तालिबानने अफगाणिस्तानप्रमाणे लवकरच पाकिस्तानातही तालिबानची राजवट येईल, अशी घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर ड्युरंड लाईनजवळील तालिबानच्या वाढत्या हालचाली निराळेच संकेत देत आहेत.
दशकांपूर्वी ब्रिटिशांनी आखलेली ही ड्युंरड लाईन तालिबानला अजिबात मान्य नाही. अफगाणिस्तानची सीमा पाकिस्तानच्या अटकपर्यंत विस्तारलेली असल्याचा दावा तालिबान करीत आहे. यावरुन तालिबानने पाकिस्तानी लष्कराला सीमेवर कुंपण घालण्यापासूनही रोखले होते. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा तालिबानच्या या अरेरावीच्या विरोधात असल्याचा दावा केला जातो. तर पाकिस्तानचे मावळते पंतप्रधान इम्रान खान यांनी तालिबानविरोधात कुठलीही भूमिका स्वीकारू नये, असे आदेश आपल्या मंत्र्यांना दिले होते, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे तालिबानबाबतच्या धोरणात पाकिस्तानचे सरकार व लष्करामध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसत आहे.