नवी दिल्ली – जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर गोळीबार करुन पाकिस्तान इथे कोरोनाव्हायरसचे रुग्ण धाडत आहे, असा आरोप भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल बी.एस.राजू यांनी केला. याआधीही पाकिस्तान कोरोनाव्हायरसच्या साथीचा भारताच्या विरोधात वापर करीत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. जनरल राजू यांच्या आरोपाचे पाकिस्तानने खंडन केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रणरेषेवरील पाकिस्तानच्या हालचाली वाढल्या असून इथे जोरदार चकमकी सुरु आहेत. यावेळी भारतीय लष्कराने घुसखोरीच्या तयारीत असलेल्या पाच दहशतवाद्यांना ठार केले होते. तर यात आपल्या लष्कराचे पाच जवान शहीद झाले होते. तर यानंतर भारतीय लष्कराने चढविलेल्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचे १५ जवान आणि सात दहशतवादी ठार झाले होते.
पाकिस्तान भारताच्या विरोधात दहशतवादी कारवाया करीत असताना, कोरोनाव्हायरसचाही वापर भारताच्या विरोधात करीत असल्याच्या बातम्या येत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या काहीजणांना घुसवून इथेही साथ पसरविण्याचे कुटिल कारस्थान पाकिस्तानने आखले आहे. भारत व नेपाळमध्ये मुक्त असलेल्या सीमेचा वापर करून इथूनही पाकिस्तान कोरोनाग्रस्त रुग्ण भारतात घुसवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वृत्त आले होते. पाकिस्तानच्या या कारवायांना ‘कोव्हिड टेररिझम’असे म्हटले जात आहे. पाकिस्तानने हे धोरण सोडून सुधारणा करावी आणि दोन्ही देशांनी कोरोनाव्हायरसच्या विरोधात लढा द्यावा, असा टोलाही लेफ्टनंट जनरल राजू यांनी पाकिस्तानला लगावला. हा सल्ला पाकिस्तानला चांगलाच झोंबल्याचे दिसत आहे. पाकिस्तानच्या लष्कराने यावर प्रत्युत्तर दिले असून भारताचे हे आरोप निराधार असल्याचा दावा केला आहे.