पाकिस्तानी लष्करच पेशावरच्या शाळेवरील हल्ल्यासाठी जबाबदार

- तेहरिक-ए-तालिबानचा प्रमुख

पेशावरइस्लामाबाद – २०१४ साली पाकिस्तानच्या लष्करानेच पेशावर येथील शाळेवर हल्ला चढवून १३२ विद्यार्थ्यांचा बळी घेतला होता, असा धक्कादायक आरोप ‘तेहरिक-ए-तालिबान’ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख नूर वली मेहसूद याने केला. पाकिस्तानी लष्करातून पलायन केलेला जवान मुदस्सर इक्बाल याने जाहीरपणे कबुली दिली होती, याची आठवणही तेहरिकच्या प्रमुखाने करुन दिली.

२०१४ साली पेशावरच्या ‘आर्मी पब्लिक स्कूल’मध्ये घुसून दहशतवाद्यांनी विद्यार्थी, शिक्षक व कर्मचार्‍यांवर बेछूट गोळीबार केला होता. यामध्ये १३२ जणांचा बळी गेला आणि यात १२८ विद्यार्थ्यांचा समावेश होता. पाकिस्तानच्या लष्कराने यासाठी तेहरिकला जबाबदार धरले होते. पण पाकिस्तानचे हे आरोप तेहरिकचा प्रमुख मेहसूद याने धुडकावले.

‘तेहरिक मुलांवर गोळ्या झाडत नाही. पाकिस्तानने स्वतंत्र चौकशी समितीची स्थापना करून या हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी मेहसूदने केली. त्याचबरोबर या हल्ल्यानंतर पळ काढलेल्या पाकिस्तानी लष्कराच्या एसएसजी कमांडो मुदस्सर इक्बाल याने दिलेल्या जबानीकडेही पाकिस्तानने लक्ष द्यावे, असे सूचक उद्गार मेहसूद याने काढले आहेत.

दरम्यान, आपला संघर्ष फक्त पाकिस्तानच्या विरोधात असून तेहरिक इतर कुठल्याही देशाविरोधात नसल्याचे मेहसूदने या मुलाखतीत म्हटले आहे.

leave a reply