पाकिस्तानचे लष्कर अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी

- बलोच नेत्याचा खळबळजनक आरोप

ग्वादर – ‘ग्वादर का हक दो` अशी घोषणा देऊन ग्वादरच्या अधिकारांसाठी मोठी मोहीम छेडणाऱ्या बलोचिस्तानच्या नेत्याने पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेवर गंभीर आरोप केला आहे. बलोचिस्तानमध्ये सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या तस्करीत पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेचा सहभाग आहे, पाकिस्तानी लष्कर या तस्करांना सहाय्य करीत असल्याचा ठपका बलोच नेता मौलाना हिदायत उर रहमान बलोच याने ठेवला. दरम्यान, पाकिस्तान सरकार, सुरक्षा यंत्रणा आणि चीनच्या ‘सीपीईसी` प्रकल्पाविरोधात गेल्या महिन्याभरापासून बलोचिस्तानमध्ये लाखोजण निदर्शने करीत असून मौलाना हिदायत याचे नेतृत्व करीतआहेत.

अंमलीग्वादर पोलीस स्टेशनसमोर सुरू असलेल्या निदर्शनांना संबोधित करताना मौलाना हिदायत उर रहमान बलोच यांनी पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेला लक्ष्य केले. बलोचिस्तानमध्ये सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या तस्करीत पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणाच सहभागी असल्याचे मौलाना हिदायत म्हणाले. हे सुरक्षा अधिकारीच बलोचिस्तानात अंमली पदार्थांच्या तस्करांना मुक्त वावर करण्याची परवानगी देत आहेत. त्यांच्यामुळेच बलोचिस्तानातील तरुण अंमली पदार्थांच्या व्यसनात ओढले जात असल्याची टीका मौलाना हिदायत यांनी केली.

23 मार्च रोजीचा प्रजासत्ताक दिन आणि 14 ऑगस्ट रोजीच्या स्वातंत्रदिनी पाकिस्तानात मोटारी काढून, त्यावर पाकिस्तानचा झेंडा फडकावून जत्थे घेऊन फिरणारे या अंमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेले आहेत. आपल्या मोटारीवर पाकिस्तानचा झेंडा लावा आणि बिनधास्त अंमली पदार्थांची तस्करी करा, असा प्रकार पाकिस्तानात सुरू असल्याचे मौलाना हिदायत यांनी निदर्शकांसमोर जाहीर केले. थेट उल्लेख केला नसला तरी मौलाना हिदायत यांनी अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्य केल्याचे दिसत आहे.

‘पाकिस्तानचे तटरक्षक दल दररोज निरपराध मच्छिमारांना अडवून त्यांची झाडाझडती घेतात. पण याच तटरक्षक दलाच्या नाकाखालून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या अपराधींना मोकळे रान दिले जाते. जिथे गुन्हेगार आणि सत्तेवर बसलेले राज्यकर्ते हातमिळवणी करतात, अशा भ्रष्ट व्यवस्थेचा आम्ही निषेध करतो`, अशी टीका मौलाना हिदायत यांनी केली. सागरी क्षेत्राबरोबरच बलोचिस्तानच्या रस्त्यारस्त्यांवर देखील हाच प्रकार सुरू असल्याचे बलूच नागरिकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या हिदायत यांनी लक्षात आणून दिले.

पाकिस्तानच्या यंत्रणांनी वेळीच या अंंमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असलेल्यांवर कारवाई करावी. अन्यथा यामध्ये सहभागी असलेल्या साऱ्यांचे खरे चेहरे जनतेसमोर आणू, अशी धमकीच मौलाना हिदायत उर रहमान बलोच यांनी दिली. आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक मार्क किन्रा यांनी देखील एका माध्यमाशी बोलताना बलोचिस्तानातील अंमली पदार्थांच्या समस्येकडे लक्ष वेधले. अफगाणिस्तानातील अंमली पदार्थांचे सेवन आणि वाहतूक बलोचिस्तान प्रांतातून अधिक प्रमाणात होते. जवळपास 30 अब्ज डॉलर्सच्या अंमली पदार्थांची वाहतूक पाकिस्तानातून केली जाते. ग्वादर बंदराबरोबरच ओरमारा, तलर, हिंगोल, सूर बंदर, पेशूकान आणि जिवानी या बंदरातूनही अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा दावा मार्क किन्रा यांनी केला.

दरम्यान, पाकिस्तानच्या सीमाभागातून अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचा आरोप इराणने देखील केला होता. सीमवरुन होणाऱ्या या तस्करीत सहभागी असलेल्यांवर पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणा कारवाई करीत नसल्याचा ठपका इराणने ठेवला होता.

क्वेट्टामधील बॉम्बस्फोटात चार ठार, 15 जखमी
क्वेट्टा, दि. 31 (वृत्तसंस्था) – गुरुवारी संध्याकाळी बलोचिस्तानची राजधानी क्वेट्टामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात चार जणांचा बळी गेला तर 15 जण जखमी झाले. येथील गव्हर्मेंट सायन्स कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या मोटारीत हा स्फोट झाला. अद्याप कुठल्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

गेल्या काही आठवड्यांपासून बलोचिस्तानमधील हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणा यासाठी बलोच बंडखोरांना जबाबदार धरत आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या जवानांना लक्ष्य करण्यासाठी बंडखोर हे हल्ले चढवित असल्याचा आरोप पाकिस्तानी यंत्रणा करीत आहेत.

leave a reply