नवी दिल्ली – रशियाच्या ‘सिक्युरिटी काऊन्सिल’चे सचिव निकोलाय पत्रुशेव्ह यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्याआधी पत्रुशेव्ह यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याशी चर्चा केली. ‘शंघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन-एससीओ’च्या बैठकीसाठी पत्रुशेव्ह नवी दिल्लीत दाखल झाले. या बैठकीत बोलताना त्यांनी सार्वभौम देशांच्या कारभारातील हस्तक्षेप करण्याच्या अपप्रवृत्तीवर टीका केली. तसेच एकतर्फी निर्बंध लादण्याच्या धोरणांवरही पत्रुशेव्ह यांनी प्रहार केले. उघडपणे नाव घेतले नसले तरी पत्रुशेव्ह यांनी अमेरिकेला लक्ष्य केल्याचे दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याबरोबरील निकोलाय पत्रुशेव्ह यांच्या भेटीचे फारसे तपशील उघड करण्यात आलेले नाही. नवी दिल्लीतील रशियन दूतावासाने पत्रुशेव्ह यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा केल्याचे म्हटले आहे. मात्र युक्रेनचे युद्ध सुरू असताना, रशियन सिक्युरिटी काऊन्सिलचे सचिव असलेल्या पत्रुशेव्ह यांची ही भारतभेट लक्षणीय ठरते. सध्या युक्रेनचे युद्ध महत्त्वाच्या टप्प्यावर आले आहे. वेळीच हे युद्ध थांबले नाही तर पुढच्या काळात या युद्धाचा अधिक मोठा भडका उडेल आणि त्याच्या ज्वाळा केवळ युरोपच नाही तर जगाला ग्रासून टाकल्यावाचून राहणार नाहीत, असे इशारे दिले जात आहेत.
अशा परिस्थिती हे युद्ध रोखण्यासाठी प्रयत्न करण्याच्या ऐवजी अमेरिका व युरोपिय देश हे युद्ध लांबवित असल्याची टीका आता या देशांमधूनच सुरू झालेली आहे. युक्रेनच्या लष्कराला प्रचंड प्रमाणात शस्त्रास्त्रांचा पुरवठा करून अमेरिका व नाटोचे सदस्यदेश या युद्धाची तीव्रता वाढवित आहेत. त्याचवेळी रशिया याच्या भीषण परिणामांची जाणीव या देशांना करून देत आहे. अशा परिस्थितीत भारत काही समविचारी युरोपिय देशांच्या सहाय्याने हे युद्ध थांबविण्यासाठी, तसेच त्याची तीव्रता कमी करण्यासाठी राजनैतिक पातळीवर प्रयत्न करीत आहे. फ्रान्सच्या भारतातील राजदूतांनी ही माहिती उघड केली होती. तसेच भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही यावर प्रकाश टाकणारी काही विधाने केली होती.
अशा परिस्थितीत निकोलाय पत्रुशेव्ह यांनी भारताच्या पंतप्र्रधानांबरोबर केलेली चर्चा लक्ष वेधून घेणारी ठरत आहे. दरम्यान, युक्रेनचे युद्ध सुरू असताना भारताच्या रशियाबरोबरील व्यापारी तसेच इतर पातळ्यांवरील सहकार्यावर टीका करणाऱ्या अमेरिका व पाश्चिमात्य देशांना चांगलेच प्रत्युत्तर मिळाल्याचे दिसते आहे.
भारताने रशियाकडून इंधनाची खरेदी अधिकच वाढविली असून द्विपक्षीय व्यापार वाढविण्यासाठीही भारताने महत्त्वाची पावले उचलली आहेत. भारत व रशियामधील व्यापार 50 अब्ज डॉलर्सवर नेण्याचे ध्येय दोन्ही देशांनी समोर ठेवले असून आर्क्टिक क्षेत्रातील इंधन उत्खननाच्या आघाडीवरही भारत रशियाला सहकार्य करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. तसेच भारत व रशिया करीत असलेला रुपया आणि रुबलमधील व्यवहार अमेरिकेला अस्वस्थ करीत असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. मात्र हे सहकार्य याच्याही पलिकडे जाऊन, रशियाची पेमेंट सिस्टीम मिर व भारताच्या रूपेमधील सहकार्य वाढविण्यासाठीही दोन्ही देशांनी हालचाली सुरू केल्या आहेत.