गिलगिट बाल्टिस्तानची जनता भारताच्या बाजूने चीनशी लढेल

- गिलगिट बाल्टिस्तानच्या राजकीय कार्यकर्त्याचा दावा

ग्लासगो – ”चीनने घोडचूक करून भारतातील १३५ कोटी जनतेला जागे केले आहे. इतकेच नाही चीनने गिलगिट बाल्टिस्तानसह संपूर्ण पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या नागरिकांनाही जागे केले आहे. गिलगिट बाल्टिस्तानचे नागरिक चीन विरोधात भारतीय लष्कराच्या खांद्याला खांदा लावून लढतील”, अशा शब्दात इथले राजकीय कार्यकर्ते अमजद अयुब मिर्झा यांनी गिलगिट बाल्टिस्तानची जनता भारताच्याबरोबर असल्याचा संदेश दिला आहे.

Gilgit-baltistanलडाख सीमेवर चीनने विश्वासघात करून भारतीय सैनिकांवर हल्ला चढविला होता. यामध्ये भारताचे २० सैनिक शहीद झाले होते. यानंतर भारत आणि चीनमध्ये कधीही संघर्ष पेटेल, अशी स्थिती आहे. अशावेळी गिलगिट बाल्टिस्तानमधील जनतेच्या भावना व्यक्त करणारा संदेश तेथील येथील राजकीय कार्यकर्ते अमजद अयुब मिर्झा यांनी दिला आहे. सध्या ते ग्लासगो येथे राजकीय निर्वासित म्हणून वास्तव्य करीत आहेत. ‘पीओके’मध्ये पाकिस्तान लष्कर करीत असलेला अत्याचार आणि तेथे पाकिस्तानी लष्कराकडून सुरु असलेल्या राजकीय हत्याकांडाबद्दल ते सतत आवाज उठवत असतात.

गेल्या ७० वर्षांपासून पीओके आणि गिलगिट बाल्टिस्तानमधील नागरिकांना भारतापासून दूर ठेवण्यात आले आहे, असे मिर्झा म्हणाले. ”चीनच्या घुसखोरीनंतर भारतासमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. चीनच्या कुरापती सतत सुरु आहेत. चीनने पाकिस्तानला आणि नेपाळच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षालाही आपल्यात सहभागी करून गलिच्छ खेळ सुरु केला आहे. अशावेळी गिलगिट बाल्टिस्तानमधील जनता शांत राहणार नाही. आम्ही भारताची साथ देऊ”, असे मिर्झा यांनी बजावले आहे.

”चीनने एक अब्ज ३५ कोटी भारतीयांना आणि त्याचबरोबरीने पीओकेतील जनतेलाही जागे केले आहे. गिलगिट बाल्टिस्तानसह पीओकेच्या जनतेच्या नशीबात भारतीय लष्कराची, भारतीय जनतेची भेट ही युद्ध भूमीवरच होणे लिहलेले असेल, तर तसेच होईल. गिलगिट बाल्टिस्तानसह पीओकेतील जनता भारतीय लष्कराच्या खांद्याला खांदा लावून लढण्यास तयार आहे”, असा संदेश मिर्झा यांनी दिला.

‘पीओके’मध्ये पाकिस्तानविरोधी सूर खूपच तीव्र झाले असून हे आवाज दडपण्यासाठी पाकिस्तान सातत्याने प्रयन्त करीत आहे. चीन पाकिस्तानमध्ये राबवित असलेल्या ‘सीपीईसी’ प्रकल्पाद्वारे गिलगिट बाल्टिस्तानच्या जनतेचे शोषण होत असून पुढच्या काळात हा प्रांत पाकिस्तानचा नाही, तर चीनचा म्हणून ओळखला जाईल अशी भीती, इथली जनता व्यक्त करीत आहे. याला अधिकृतता बहाल करण्यासाठी पाकिस्तान गिलगिट बाल्टिस्तानला आपला पाचवा प्रांत घोषित कारण्याच्या तयारीत आहे. याला येथील जनता जबरदस्त विरोध करीत आहे.

भारताने जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविल्यानंतर भारताने गिलगिट बाल्टिस्तानच्या नेत्यांनी आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी भारताकडे गिलगिट बाल्टिस्तानच्या जनतेच्या दुःखाचे लवकर निवारण करावे आणि आम्हाला भारतात सहभागी करून घ्यावे, अशी मागणी केली होती. गिलगिट बाल्टिस्तान हा भारताचा भूभाग आहे, अशी येथील जनता ठासून सांगू लागली आहे. म्हणूनच पाकिस्तान आणि चीनकडून इथल्या जनतेवर होत असलेल्या अन्यायाला रोखून भारताने हा भूप्रदेश आपला असल्याचे जाहीर करावे, असे कळकळीचे आवाहन येथील स्थानिकांकडून केले जात आहे. चीनसारख्या देशाबरोबरील भारताच्या सीमावादात भारतची बाजू घेऊन मिर्झा यांनी गिलगिट बाल्टिस्तान मधील जनतेच्या भावना व्यक्त केल्याचे दिसत आहे.

leave a reply