अथेन्स – ग्रीसची राजधानी अथेन्समधील ज्यूधर्मियांचे प्रार्थनास्थळ, सांस्कृतिक केंद्र, हॉटेल्स आणि इस्रायली नागरिकांना लक्ष्य करण्याचा मोठा कट उधळण्यात आला आहे. इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादने दिलेल्या माहितीनंतर ग्रीसच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाकिस्तानी नागरिकत्व असलेल्या दोघांना ताब्यात घेतले. पण या दोघांचाही जन्म इराणमध्ये झाल्याचे उघड झाल्यानंतर मोसादने हे इराणच्या दहशतवादी नेटवर्कचे कारस्थान असल्याचा संशय व्यक्त केला. यानंतर इस्रायलने पर्यटनासाठी परदेशी गेलेल्या आपल्या नागरिकांसाठी अलर्ट जारी केला आहे.
ग्रीस पोलीस यंत्रणा आणि मोसादने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, इराणस्थित सूत्रधाराने अथेन्स व इतर शहरात हल्ल्यांचा कट आखला होता. 27 व 29 वर्षीय दोन हल्लेखोर या कटात सहभागी होती. दोन्ही हल्लेखोरांनी चार महिन्यांपूर्वी तुर्कीमागे ग्रीसमध्ये घुसखोरी केली होती. त्यांच्याकडे अधिकृत परवाने किंवा कागदपत्रे नसल्याचे उघड झाले होते. ज्यूधर्मिय व इस्रायली नागरिकांची गर्दी असलेल्या ठिकाणांना लक्ष्य करण्याची तयारी या हल्लेखोरांनी केली होती. बंदूक न सापडल्यामुळे गॅस सिलिंडरचा स्फोट घडविण्याची भयंक योजना यांनी आखली होती. या हल्ल्यात ठार होणाऱ्या प्रत्येक नागरिकामागे हल्लेखोरांना 15 हजार युरो मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
याआधी इराणने युरोपमधील इस्रायलच्या हितसंबंधांना लक्ष्य करण्यासाठी रिव्होल्युशनरी गार्ड्सचे एजंट्स व हिजबुल्लाहचा वापर केला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने ब्रिटनस्थित इराणी वृत्तवाहिनी व पत्रकारांवर हल्ल्याचा कट आखला होता. त्यानंतर महिन्याभरात ब्रिटीश गुप्तचर यंत्रणा एमआय5ने असे 15 कट उधळल्याचा दावा केला होता.
गेल्याच वर्षी जून महिन्यात तुर्कीमध्ये इस्रायली व्यावसायिकांवर हल्ल्याची योजना उघडकीस आली होती. यासाठी इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने तुर्कीच्या सुरक्षा यंत्रणेला माहिती पुरविली होती. तर फ्रान्स, हॉलंड, डेन्मार्क या देशांमध्येही रिव्होल्युशनरी गार्ड्सनी हल्ल्याचा कट आखल्याचे समोर आले होते.
काही दिवसांपूर्वीच इस्रायलने युरोपमधील ज्यूधर्मियांच्या सुरक्षेला धोका असल्याचा इशारा जारी केला होता. पण ग्रीसमधील कट उधळल्यानंतर इराणने इतर देशांमधील एजंट्स वापरण्याची तयारी केली. या पार्श्वभूमीवर, इस्रायलच्या यंत्रणेने चिंता व्यक्त करून युरोप, आखाती तसेच आफ्रिकेत पर्यटनासाठी जाणाऱ्या इस्रायलींनी सावध रहावे, असा इशारा दिला आहे.