अमृतकाळात देशाने पंचप्राण संकल्पांवर लक्ष केंद्रीत करावे

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश

पंचप्राणनवी दिल्ली – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढच्या 25 वर्षांसाठी देशासमोर पंचप्राण संकल्प ठेवला आहे. ‘यापुढे देशाने आपल्यासमोर भव्य संकल्प ठेवायला हवे. गुलामगिरीचा अंशमात्र आपल्यामध्ये शिल्लक राहू न देणे. आपल्याला लाभलेल्या वैभवशाली वारशाचा अभिमान बाळगणे. एकजूट व एकतेसाठी प्रयत्न करणे. तसेच नागरिकांच्या कर्तव्याचे भान ठेवणे, अशा पाच संकल्पांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरील आपल्या भाषणात केली.

देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना, स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या नेत्यांच्या बलिदानाचा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधानांनी केला. त्याचवेळी आपण आत्तापर्यंत जे काही मिळवले आहे, त्यात आत्मसंतुष्ट राहून चालणार नाही, याची जाणीव पंतप्रधानांनी करून दिली. ‘आज आपण देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतकाळात प्रवेश करीत आहोत. पुढची 25 वर्षे आपल्या देशासाठी अतिशय महत्त्वाची ठरतील. देश त्यावेळी स्वातंत्र्याचे शतक साजरे करीत असेल. त्यावेळी भारताला विकसित देश बनविण्याचे ध्येय आत्तापासूनच सर्वांनी समोर ठेवायला हवे. यासाठी पंचप्र्राण संकल्पावर आपली शक्ती व सामर्थ्य केंद्रीत करायला हवे’, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

यापुढे देशाने आपल्यासमोर मोठे संकल्प ठेवायला हवेत. विकसित भारताच्या निर्मितीखेरीज दुसरे काहीही आपल्यासमोर असता कामा नये. संकल्प मोठा याचा अर्थ पुरुषार्थही मोठा, त्यासाठी लागणारी शक्तीही मोठी, असे सांगून भारताने आपल्यासमोर भव्य संकल्पच ठेवायला हवेत, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. त्याचवेळी गेल्या काही वर्षात देशाने जगाला थक्क करणारी कामगिरी करून आपल्याकडे असाधारण क्षमता असल्याचे दाखवून दिले, याकडे पंतप्रधानांनी लक्ष दिले. कोरोनाची साथ आलेली असताना, भारताने अत्यंत कमी वेळात कोरोनाच्या दोनशे कोटी लसींचे डोस देण्याचा विक्रम केला, ही बाब पंतप्रधानांनी लक्षात आणून दिली.

तर गुलामगिरीचा अंशमात्रही आपल्यामध्ये शिल्लक राहू नये, आपल्या सवयी व विचार यामध्ये त्याची पडछाया पडता कामा नये, याची दक्षता घेण्याची सूचना पंतप्रधानांनी दुसऱ्या संकल्पात केली. तर आपल्याला लाभलेल्या गौरवशाली वारशाचा अभिमान आपल्याला असायलाच हवा, असे पंतप्रधानांनी तिसऱ्या संकल्पाबद्दल बोलताना ठासून सांगितले. याच वारशाने भारताला सुवर्णकाळ दाखविला होता. भारताचा वारसा काळानुरूप यथोचित बदल घडवून आणण्याचे व योग्य त्या नव्या गोष्टी स्वीकारण्याची क्षमता बाळगून आहे, याचा आपल्याला अभिमान वाटलाच पाहिजे.

130 कोटी देशवासियांमध्ये एकता व एकजूट असावी, एक भारत-श्रेष्ठ भारत हे आपले ध्येय असावे, असे सांगून पंतप्रधानांनी चौथ्या संकल्पाची माहिती दिली. तर नागरिकांच्या कर्तव्याचे भान असणे, हा पंचप्राण संकल्पामधील पाचवा संकल्प असल्याचे पंतप्रधान म्हणाले. नागरिकांच्या या कर्तव्याच्या जाणीवेतून पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांनाही वगळता येणार नाही, असे पंतप्रधानांनी बजावले आहे.

सारे जग भारताकडे आशेने पाहत आहे. समस्यांचे समाधान भारताकडून येईल, असा विश्वास जगाला वाटू लागला आहे. जगाच्या भारताबाबतच्या विचारांमध्ये झ्ाालेला हा बदल गेल्या 75 वर्षातील भारताच्या वाटचालीमुळे झ्ाालेला आहे, असे पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.

leave a reply