राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडून अमेरिकेत येणार्‍या बेकायदा निर्वासितांना मोकळीक

वॉशिंग्टन – माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्वासितांविरोधात राबविलेले धोरण अमेरिकेला काळिमा फासणारे असल्याचा दावा करून, राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकेतील बेकायदा निर्वासितांना मोकळीक देणारे वटहुकूम जारी केले आहेत. या वटहुकुमामुळे, मध्य अमेरिकेतून अमेरिकेत दाखल झालेल्या बेकायदा निर्वासितांना आपल्या मुलांना अमेरिकेत आणण्याची संधी मिळणार आहे. त्याचवेळी अमेरिकेत यापूर्वी दाखल झालेल्या बेकायदा निर्वासितांना नागरिकत्व नाकारणार्‍या निर्णयांचा आढावा घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या कारकिर्दीत घुसखोर निर्वासितांच्या हकालपट्टीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी अमेरिकेचा परराष्ट्र विभाग, अंतर्गत सुरक्षा विभाग व न्याय विभागाच्या माध्यमातून अनेक आक्रमक निर्णय घेण्यात आले होते. २०१९ साली झालेल्या ‘स्टेट ऑफ युनियन’ भाषणात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी, देशाच्या दक्षिण सीमेवरून घुसणारे लोंढे हे राष्ट्रीय संकट असल्याचा इशारा दिला होता. मेक्सिको सीमेवर ‘बॉर्डर वॉल’चे काम सुरू करून तसेच अतिरिक्त सुरक्षायंत्रणा तैनात करून निर्वासितांच्या लोंढ्यांना पायबंद घालण्याचे प्रयत्न केले होते.

निर्वासितांनी सीमेपर्यंत पोहोचू नये यासाठी संबंधित देशांबरोबर करारही करण्यात आले होते. ट्रम्प यांचे धोरण ‘झिरो टॉलरन्स पॉलिसी’ म्हणून ओळखण्यात येते. त्यांच्या या धोरणाला रिपब्लिकन पक्षातूनही काही प्रमाणात विरोध झाला होता. मात्र ट्रम्प यांनी आक्रमकपणे राबविलेल्या निर्णयांमुळे अमेरिकेत येणार्‍या निर्वासितांची संख्या व गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीयरित्या घटल्याचे विविध अहवालांमधून समोर आले होते. मात्र आता नवे राष्ट्राध्यक्ष बायडेन व संसदेत बहुमत असलेल्या डेमोक्रॅट पक्षाने ट्रम्प यांचे निर्णय उलट फिरविण्याच्या हालचालींना वेग दिला आहे.

बायडेन व डेमोक्रॅट पक्षाने अमेरिकेत येणार्‍या निर्वासितांच्या लोंढ्यांबाबत कायम सौम्य भूमिका घेतली असून त्यांना अधिकाधिक संरक्षण पुरविणारे कायदे व तरतुदी केल्या आहेत. राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ज्यो बायडेन यांनी हेच धोरण पुढे चालविण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. २० जानेवारीला सूत्रे हाती घेतल्यानंतर बायडेन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जारी केलेला ‘ट्रॅव्हल बॅन’ तसेच ‘मेक्सिको वॉल प्रोजेक्ट’ तातडीने रद्द केला होता. त्यानंतर आता सलग तीन वटहुकूम जारी करीत निर्वासितांबाबतचे धोरण पूर्णपणे बदलण्याची तयारी सुरू झाली आहे.

मंगळवारी जारी केलेल्या वटहुकुमांमध्ये अमेरिका-मेक्सिको सीमेवरून घुसखोरी केलेल्या निर्वासितांच्या मुलांना अमेरिकेतील त्यांच्या पालकांकडे पाठविण्याच्या निर्णयाचा समावेश आहे. ट्रम्प यांच्या कारकिर्दीत या मुलांना त्यांच्या पालकांपासून वेगळे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचवेळी मध्य अमेरिकेतील इतर देशांमधून येणार्‍या निर्वासितांना रोखणार्‍या ‘रिमेन इन मेक्सिको पॉलिसी’चा आढावा घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. घुसखोरी करणार्‍या बेकायदा निर्वासितांना शिक्षा देणारी ‘पब्लिक चार्ज पॉलिसी’ तसेच नागरिकत्व देण्यासंदर्भातील कठोर तरतुदी मागे घेण्याचेही संकेत देण्यात आले आहेत.

राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी निर्वासितांसाठी अमेरिकेच्या सीमा खुले करणारे निर्णय घेतल्याने घुसखोर निर्वासितांचे नवे लोंढे मोठ्या प्रमाणात अमेरिकेत दाखल होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

leave a reply