काबूल – अमेरिका आणि तालिबान यांच्यातील शांतीचर्चेसाठी मध्यस्थी केल्यानंतर, पाकिस्तानला अफगाणिस्तानवर वर्चस्व गाजविण्याचे आपले स्वप्न साकार होईल, असे वाटत होते. पण अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी पाकिस्तानला सणसणीत चपराक लगावली आहे. ‘भारत आणि अफगाणिस्तान आपल्या भूमीचा वापर परस्परांच्या व दुसऱ्या देशाच्या विरोधात न करु देण्यावर ठाम आहेत. त्यामुळे भारताबरोबर सहकार्याची संधी अमर्याद उपलब्ध झाली आहे’, असे राष्ट्राध्यक्ष गनी यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना सुनावले. स्वतः राष्ट्राध्यक्ष गनी यांनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी नुकतीच अफगाणिस्तानला भेट दिली होती. या भेटीत जनरल बाजवा यांनी राष्ट्राध्यक्ष गनी आणि विशेष कार्यकारी अधिकारी अब्दुल्ला अब्दुल्ला यांच्याशी चर्चा केली. पाकिस्तानी लष्करप्रमुखांचा हा दौरा अघोषित होता. त्याचे फार तपशील उपलब्ध झालेले नाहीत. अफगाणिस्तानात सुरु असलेली शांतीप्रकिया, अफगाणी सरकार व तालिबानमधील चर्चा या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख बाजवा यांनी हा दौरा केल्याचे समोर येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका टेलिकॉन्फरन्स आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानी लष्करप्रमुखांबरोबर झालेल्या चर्चेची माहिती दिली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आपली भूमी परस्परांच्या विरोधात न वापरु देण्यावर एकमत झालेले आहे. तसेच अफगाणिस्तानसाठी भारताबरोबरील सहकार्याच्या अर्मयाद संधी उपलब्ध झाल्या आहेत, असे आपण जनरल बाजवा यांना सांगितल्याचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी म्हणाले. वेगळ्या शब्दात पाकिस्तानची भूमी अफगाणिस्तानच्या विरोधात वापरता येणार नाही. म्हणूनच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सहकार्याला खूपच मर्यादा आहेत, असे राष्ट्राध्यक्ष गनी यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुखांना बजावल्याचे दिसते.
अफगाणिस्तानमध्ये दोन अब्ज डॉर्लसहून अधिक रक्कमेचे विकासप्रकल्प राबवून या देशाची लोकशाही बळकट करणाऱ्या भारताचा इथला प्रभाव नष्ट करण्यासाठी पाकिस्तान धडपडत आहेत. अमेरिका आणि तालिबानमध्ये चर्चेसाठी केलेल्या मध्यस्थीमुळे मिळालेल्या श्रेयाचा वापर करून पाकिस्तान अफगाणिस्तानातील भारताच्या हितसंबंधाना धक्का देऊ पाहत आहेत. यासाठीच पाकिस्तानचे लष्करप्रमुख अफगाणिस्तानच्या दौऱ्यावर गेले असावे, अशी दाट शक्यता आहे. मात्र अफगाणिस्तानाचे राष्ट्राध्यक्ष गनी यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना परखड शब्दात वास्तवाची जाणीव करुन दिली. तसेच याची माहिती जगजाहीर करुन राष्ट्राध्यक्ष गनी यांनी पाकिस्तानचे अफगाणिस्तानातील भारतविरोधी मनसुबे देखील जगासमोर मांडले आहेत. भारताला स्थीर, लोकशाहीवादी, प्रगतीशील अफगाणिस्तान अपेक्षित आहे. यासाठी भारत अब्जावधी डॉर्लसची गुंतवणूक करीत आहे. तर पाकिस्तानला अफगाणिस्तानची सूत्रे हातात सोपवायची आहेत. यामुळे अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेला तर त्याचा भारताच्या विरोधात दहशतवादी कारवायांसाठी वापर करता येईल, असा पाकिस्तानचा तर्क आहे. पण आताच्या काळातील परिस्थिती लक्षात घेता पाकिस्तानला अफगाणिस्तानच्या विरोधात वापर करता येणार नाही, असे मुत्सद्दी तसेच विश्लेषकांचे म्हणणे आहे. आता राष्ट्राध्यक्षांनीही पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना याची समज दिल्याचे दिसत आहे.