बीजिंग/वॉशिंग्टन – गेल्या काही दिवसात चीनमधील कोरोनाच्या संसर्गाची व्याप्ती वाढत असल्याचे समोर येत आहे. शुक्रवारी २४ तासांमध्ये चीनमध्ये दीड हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. ही रुग्णसंख्या गेल्या दोन वर्षात २४ तासांमध्ये आढळलेली सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर चीनने चँगचुन व युचेंग शहरात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. दरम्यान, कोरोना साथीत दगावणार्यांची संख्या जाहीर आकडेवारीपेक्षा तिप्पट असू शकते, असा दावा अमेरिकेतील एका अभ्यासगटाने केला आहे.
कोरोनाचा उगम असणार्या चीनमध्येच पुन्हा रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेले काही दिवस चीनमध्ये दररोज ५०० हून अधिक रुग्ण आढळत असून शुक्रवारी ही संख्या दीड हजारांवर गेल्याचे समोर आले. चीनमधील पाच प्रांत कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झाले असून त्यात जिलिन, ग्वांगडॉंग, शान्डॉंग, जिआंग्सु, गान्सु यांचा समावेश आहे. चीनचे आर्थिक व व्यापारी केंद्र म्हणून ओळखण्यात येणार्या शांघाय शहरातही रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शांघायमधील शिक्षणसंस्था व इतर उपक्रम बंद करण्यात आले आहेत.
ईशान्य चीनमधील चँगचुन व पूर्व चीनमधील युचेंग या शहरांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. चँगचून हे ९० लाख लोकसंख्येचे शहर असून जिलिन प्रांताची राजधानी आहे. तर शान्डॉंग प्रांतातील युचेंगची लोकसंख्या पाचा लाखांहून अधिक असल्याचे सांगण्यात येते. चीनच्या मुख्य भागातील या भागांव्यतिरिक्त हॉंगकॉंग कोरोनाचा नवा ‘हॉटस्पॉट’ बनल्याचे उघड झाले आहे. गेल्या तीन महिन्यांच्या अवधीत हॉंगकॉंगमध्ये पाच लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून सुमारे अडीच हजार जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमधील या नव्या उद्रेकाने सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने राबविलेल्या ‘झीरो कोविड पॉलिसी’वर प्रश्नचिन्हे उभी राहिली आहेत.
कम्युनिस्ट राजवटीने २०१९ साली सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीनंतर या धोरणाचा अवलंब करून चीनमधील कोरोनाची साथ आटोक्यात ठेवल्याचा दावा केला होता. त्याचवेळी सर्वात आधी लसीकरण सुरू करून साथीवर विजय मिळविल्याच्या बढाया मारल्या होत्या. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून चीनच्या राजधानी बीजिंगसह विविध भागांमध्ये झालेल्या उद्रेकांनी कम्युनिस्ट राजवटीचे दावे पोकळ असल्याचे स्पष्ट दाखवून दिले आहे. ही बाब राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यासाठी अडचणीत आणणारी ठरु शकते, असा दावा विश्लेषकांकडून करण्यात येतो.
दरम्यान, अमेरिकेतील ‘इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स ऍण्ड इव्हॅल्युशन’ या अभ्यासगटाने कोरोनाच्या बळींसंदर्भात नवा दावा केला आहे. कोरोनामुळे जगभरात बळी पडलेल्यांची खरी संख्या एक कोटी, ८० लाखांहून अधिक असू शकते असे या अभ्यासगटाने म्हटले आहे. सध्या प्रसिद्ध होणार्या आकडेवारीनुसार, जगभरात कोरोनामुळे ६० लाख जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र अमेरिकी अभ्यासगटाने प्रसिद्ध केलेली आकडेवारी त्याच्या तिपटीहून अधिक आहे. कोरोना साथीपूर्वी होणारे मृत्यू व साथ आल्यानंतर झालेले एकूण मृत्यू यांची तुलना करून सदर दावा करण्यात आल्याचे अमेरिकी अभ्यासगटाने म्हटले आहे.