चीनमध्ये कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढली

- शांघायमध्ये लष्करी तुकड्यांसह १५ हजार अतिरिक्त आरोग्य कर्मचार्‍यांची तैनाती

संसर्गाची व्याप्तीबीजिंग/लंडन – चीनमध्ये कोरोनाच्या संसर्गाची व्याप्ती वाढण्यास सुरुवात झाली असून आर्थिक केंद्र असलेल्या शांघायमध्ये दोन दिवसात १६ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठवड्यात शांघायमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतरही रुग्णसंख्येत भर पडणे सुरूच असून चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने ‘आर्मी मेडिकल युनिट’सह १० हजार आरोग्य कर्मचारी तैनात करीत असल्याची घोषणा केली आहे. चीनच्या डालिअन शहरात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिअंटचा नवा उपप्रकार आढळला असून या उपप्रकाराने चिनी यंत्रणांसमोरील चिंता अधिकच वाढविल्याचे सांगण्यात येते.

कोरोनाचा उगम असणार्‍या चीनमध्येच पुन्हा रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. एकट्या मार्च महिन्यात चीनमध्ये ६० हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. २०१९ साली वुहानमध्ये आढळलेल्या रुग्णसंख्येपेक्षा ही संख्या जास्त असल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. गेले काही दिवस चीनमध्ये १० हजार व त्याहून अधिक रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली असून रविवारी १३ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. त्यातील ९ हजारांहून अधिक रुग्ण एकट्या शांघाय शहरात आढळले आहेत. शांघायव्यतिरिक्त जिलिन व हेलॉंगजिआंग प्रांतात रुग्णसंख्या वाढत असल्याचे समोर आले आहे.

जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर व चीनच्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखण्यात येणार्‍या शांघायमध्ये ५ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्याने शांघायमधील स्थितीत फरक न पडल्याने चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने आक्रमक पावले उचलली आहेत. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा भाग असलेले वैद्यकीय पथक शांघायमध्ये तैनात करण्यात आले आहे. यात सुमारे दोन हजार डॉक्टर्स व जवानांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त देशाच्या इतर प्रांतांमधून १५ हजार डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचार्‍यांनाही शांघायमध्ये धाडण्यात आल्याची माहिती चिनी माध्यमांनी दिली.

संसर्गाची व्याप्तीचीनमधील या नव्या उद्रेकाने सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने राबविलेल्या ‘झीरो कोविड पॉलिसी’वर प्रश्‍नचिन्हे उभी राहिली आहेत. कम्युनिस्ट राजवटीने २०१९ साली सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीनंतर या धोरणाचा अवलंब करून चीनमधील कोरोनाची साथ आटोक्यात ठेवल्याचा दावा केला होता. त्याचवेळी सर्वात आधी लसीकरण सुरू करून साथीवर विजय मिळविल्याच्या वल्गनाही केल्या होत्या. मात्र आता हेच धोरण चीनची अर्थव्यवस्था व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमेसाठी अडचणीचे ठरत असल्याचे दावे समोर येऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वी ‘चायनीज युनिव्हर्सिटी ऑफ हॉंगकॉंग’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात, ‘झीरो कोविड पॉलिसी’मुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला दर महिन्याला ४५ अब्ज डॉलर्सहून अधिक नुकसान सहन करावे लागत असल्याचा इशारा देण्यात आला होता.

चीनबरोबरच दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन व चिली या देशांमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

leave a reply