‘लोन वुल्फ’चे हल्ले रोखणे अवघड होत चालले आहे

- एफबीआय व एमआय5च्या प्रमुखांचा इशारा

‘लोन वुल्फ'लंडन – ‘लोन वुल्फ’ अर्थात एकांडे हल्लेखोर यांना शोधणे किंवा त्यांच्यावर कारवाई करणे अवघड बनत चालले आहे. कारण कुठल्याही संघटनेशी न जोडलेल्या अशा हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी पुरेशी माहिती उपलब्ध नसते’, असा इशारा अमेरिका व ब्रिटनच्या आघाडीच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी दिला. ब्रिटनला अशा लोन वुल्फ अर्थात एकांड्या दहशतवाद्यांकडून फार मोठ्या हल्ल्याचा धोका असल्याचे याधीच बजावण्यात आले होते.

अमेरिकी गुप्तचर यंत्रणा ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन-एफबीआय’चे प्रमुख ख्रिस्तोफर रे यांनी गेल्या आठवड्यात ब्रिटीश गुप्तचर यंत्रणा ‘एमआय5’चे संचालक केन मॅक्लम यांची भेट घेतली. या भेटीतच रे आणि मॅक्लम यांनी लोन वुल्फच्या धोक्याकडे जगाचे लक्ष वेधले. ‘अशा प्रकारच्या हल्ल्यांसाठी मोठी योजना आखायची गरज नसते. एकाहून अधिक जणांचा समावेश नसतो. याचाच अर्थ कमीतकमी वेळेत आणि हाताशी असलेल्या त्रोटक माहितीच्या आधारावर हे हल्ले रोखण्याचे मोठे काम सुरक्षा यंत्रणेवर असते’, अशी माहिती अमेरिका व ब्रिटीश गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी दिली.

‘लोन वुल्फ'अशावेळी दोन देशांच्या गुप्तचर यंत्रणेकडील माहिती परस्परांसाठी सहाय्यक ठरू शकते, असे सांगून एफबीआयच्या प्रमुखांनी एमआय5बरोबर नव्याने सहकार्य प्रस्थापित केल्याची घोषणा केली. उभय देशांमधील सहकार्य वेळीच वाढविले नाही तर या हल्ल्यांची तीव्रता वाढेल, असा इशारा रे आणि मॅक्लम यांनी दिला.

आपल्या देशात दाखल झालेल्या स्थलांतरीतांमधून अशाप्रकारच्या हल्ल्याची दाट शक्यता असल्याचा दावा एमआय5च्या संचालकांनी केला. गेल्या काही वर्षांमध्ये ब्रिटनमध्ये झालेल्या लोन वुल्फच्या हल्ल्यांमागे स्थलांतरित परदेशी नागरिक असल्याचे उघड झाले होते. या पार्श्वभूमीवर एमआय5च्या प्रमुखांनी लोन वुल्फचे हल्ले आणि स्थलांतरीत यांची तार जोडण्याचा केलेला प्रयत्न लक्षवेधी ठरतो.

गेल्या आठ दशकांपासून अमेरिका व ब्रिटनच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये सहकार्य आहे. पण लोन वुल्फचे हल्ले रोखण्यासाठी हे सहकार्य अधिक व्यापक करण्याची आवश्यकता असल्याचे दोन्ही गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी स्पष्ट केले.

leave a reply