कोरोनावर लस विकसित करीत असलेल्या तीन संस्थांना पंतप्रधानांची भेट

- लसीच्या प्रगतीबाबत आढावा घेतला

नवी दिल्ली – शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात कोरोनाची लस तयार करण्यात व्यस्त असलेल्या तीन संस्थांचा दौरा केला आणि कोरोना लसीच्या प्रगतीबाबत आढावा घेतला. या तिनही संस्थांनी विकसित केलेल्या कोरोना लसीच्या चाचण्या अंतिम टप्यात आहेत. पुढील वर्षाच्या सुरुवातीला किंवा मार्चपर्यंत कोरोनावर लस येऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. लस आल्यावर त्याचे वितरण आणि इतर व्यवस्थेसंबंधीत सरकारकडून योजना तयार करण्यात आली असून यासंदर्भात हालचालींना वेग आला आहे. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांनी या संस्थांना दिलेली भेट महत्वाची ठरते. तसेच कोरोना लसीची वाहतूक आणि साठवण यासाठी लक्झमबर्गच्या कंपनीशी भारत करार करू शकतो, असे वृत्त आहे.

अहमदाबाद येथील झायडस कॅडिला, हैदराबाद येथील भारत बायोटेक आणि पुण्यातील सिरम इन्टिट्यूट ऑफ इंडिया या तीन संस्थांना पंतप्रधान मोदी यांनी भेट दिली. या संस्थांसकडून विकसित करण्यात येत असलेल्या लसीच्या प्रक्रियेचा आणि या याबाबत झालेल्या प्रगतीचा आढावा पंतप्रधानांनी घेतला. यावेळी येथील वैज्ञानिकांनी संवाद साधून त्यांना पंतप्रधान मोदी यांनी प्रोत्साहीत केले.

झायडस कॅडिलाच्या अहमदाबाद जवळील प्रकल्पाला आणि प्रयोगशाळेला भेट दिल्यावर पंतप्रधान मोदी यांनी या कंपनीच्या कामाचे कौतूक केले. झायडस बायोटेक पार्कला भेट दिल्यावर झायडसकडून विकसित करण्यात येत असलेल्या ‘डीएनए’ आधारीत भारतीय लसीबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळाली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच भारत सरकार या संस्थेला संपूर्ण सहकार्य करीत असल्याचे पंतप्रधानांनी आधोरेखित केले. झायडस कॅडिलकडून ‘झायकोव्ह-डी’ नावाची लस विकसित करण्यात येत आहे. या लसीच्या पहिल्या दोन टप्यातील मानवी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. तसेच डिसेंबरमध्ये ं‘झायकोव्ह-डी’च्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या होणार आहेत.

यानंतर पंतप्रधानांनी हैदराबादच्या जिनोम व्हॅलीतील भारत बायोटेकच्या प्रकल्पाला भेट दिली. भारत बायोटेकने कोरोनावर ‘कोव्हॅक्सीन’ नावाची लस विकसित केली आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या देशातील विविध शहरांमध्ये सध्या सुरू आहेत. तसेच याचे परिणाम चांगले येत असल्याचे दावे केले जात आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ‘कोव्हॅक्सीन’च्या प्रगतीची माहिती घेतल्यावर येथील संशोधकांचे अभिनंदन केले. ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’बरोबर (आयसीएमआर) भारत बायोटेकची एक टीम या लसीची अधिक वेगाने प्रगती होण्यासाठी काम करीत असल्याचे पंतप्रधानांनी सोशल मीडियावरून आधोरेखित केले.

सर्वात शेवटी पंतप्रधान मोदी यांनी सिरम इन्टिटट्यूटला भेट दिली. सिरम इन्टिटट्यूटने ब्रिटिश-स्विडीश कंपनी ॲस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्डबरोबर लस विकसित केली असून या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्याही पूर्ण झाल्या होत्या. मात्र तिसऱ्या टप्प्यातील काही चाचण्यांमध्ये त्रूटी राहिल्याने पुन्हा या चाचण्या कंपनीकडून केल्या जात आहेत. पंतप्रधानांनी याबाबत सिरमच्या प्रमुखांबरोबर इतर संशोधकांशी संवाद साधला. येथीही लस मोठ्या प्रमाणावर निर्मिती आणि साठवणुकीच्या तयारीबाबत पंतप्रधानांनी आढावा घेतला.

दरम्यान, कोरोनावर लस आल्यावर या लसीचे वितरण करताना वाहतूक व्यवस्थित व्हावी, यासाठी लागणारे शितवातावरण नियंत्रित रहावे यासाठी भारत सरकार लक्झमबर्गची कंपनी बी. मेडिकल सिस्टिम बरोबरब करार करण्याच्या विचारात आहे, असे वृत्त आहे. यासाठी या कंपनीची एक टीम लवकरच भारतात येणार असून या लसीसाठी कोल्ड चेन स्थापन करण्यासह फ्रिज, शितखोके इत्यादी गोष्टी ही कंपनी पुरविणार आहे. पुढील काळात ही कंपनी भारतातच यासाठी प्रकल्प स्थापन करण्याचा विचार करीत असल्याची माहिती समोर येत आहे.

leave a reply