नवी दिल्ली – ‘ भारताला कुणी आव्हान देण्याचा प्रयत्न केला, तर त्याला सडेतोड प्रत्युत्तर मिळाल्यावाचून राहणार नाही. सारे जग विस्तारवादी मानसिकतेने हैराण आहे. हा विस्तारवाद १८ व्या शतकातील विकृत मानसिकता दर्शवतो’, अशा घणाघाती शब्दात पंतप्रधान मोदी यांनी चीनचे नाव न घेता चीनला लक्ष केले. तसेच यावर्षी जवानांबरोबर दिवाळी साजरी करण्यासाठी ‘लोंगेवाला’ पोस्टची निवड करून पंतप्रधानांनी पाकिस्तानलाही थेट संदेश दिला. जगातील कोणतीही शक्ती भारतीय सैनिकांना आपल्या देशाचे रक्षण करण्यापासून रोखू शकत नाही, असे असे पंतप्रधानांनी ठणकावले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जैसलमेरमधील पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या ‘लोंगेवाला’ पोस्टवर तैनात सैनिकांबरोबर दिवाळी साजरी केली. १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धात जैसलमेरमधील ‘लोंगेवाला’मध्ये झालेल्या घनघोर संघर्षाने युद्धाची दिशा बदलली होती. केवळ १२० भारतीय सैनिकांनी दाखविलेल्या अतुलनिय पराक्रमामुळे पाकिस्तानी जवानांना युद्धभूमी सोडून पळ काढावा लागला होता. पाकिस्तानचे अडीच हजार जवान आणि त्यांचे ३६ रणगाडे या वीर भारतीय सैनिकांपुढे कुचकामी ठरले होते. आपल्या प्राणाचे बलिदान देत भारतीय सैनिकांनी रात्रभर पाकिस्तानी जवानांना ‘लोंगेवाला’मध्ये रोखून धरले होते. इतकेच नाही जबरदस्त व्यूहरचना आखून पाकिस्तानचे काही रणगाडेही उद्धवस्त केले. ही लढाई जगातील महत्वाच्या रणगाडा युद्धामध्ये गणली जाते.
पंतप्रधानांनी या युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकांच्या स्मारकाला भेट देत आदरांजली वाहिली. तसेच भारतीय लष्कराच्या रणगाड्यावर बसून शत्रूला संदेशही दिला. आज भारताचे सामर्थ्य वीर जवानांमुळे आहे. यामुळेच भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली बाजू ठामपणे मांडू शकतो, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारत आपल्या हिताशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही. हे आता साऱ्या जगाला कळून चुकले आहे. आज जग ज्या विस्तारवादी विकृत मानसिकतेमुळे चिंतेत आहे, त्याविरोधात भारत एक प्रखर आवाज बनत असल्याचे सांगून पंतप्रधानांनी भारताचे सामर्थ्य अधोरेखित केले.
दरम्यान, ‘लोंगेवाला’नंतर जैसलमेर येथील हवाई तळालाही भेट देऊन येथे तैनात वायुसेनेच्या जवानांबरोबर पंतप्रधानांनी सवांद साधला. भारतीय सैनिकांच्या हुंकाराने शत्रूंचे पाय लटपटू लागतात, घाम फुटू लागतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. देशांच्या सीमांचे रक्षण करणारे सैनिकचे देशाचे सामर्थ्य आहे. सामर्थ्य हाच विजयाचा विश्वास आहे आणि सामर्थ्य असेल तरच शांतात राखता येते, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ‘ दिवाळीत दारात शुभ लाभ लिहून रांगोळीचा सडा काढला जातो. दिवाळीत समृद्धी घरी यावी हा यामागील विचार असतो. मात्र आपल्या देशाची समृद्धी आणि शुभ लाभ तुमच्यामुळे आणि तुमच्या पराक्रमामुळे आहे. यामुळेच आज देशाच्या घराघरात तुम्हा सर्वांचे गौरवगान सुरु आहे’, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी सैनिकांची मुक्त कंठाने प्रशंसा केली.