हंगेरी व सर्बियातील निवडणुकांमध्ये रशियासमर्थक नेत्यांचा विजय

रशियासमर्थकबुडापेस्ट/बेलग्रेड/मॉस्को – रविवारी युरोप खंडातील हंगेरी व सर्बिया या दोन देशांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये रशियासमर्थक नेत्यांना विजय मिळाला आहे. हंगेरीत ‘फिडेस्झ पार्टी’चे व्हिक्टर ऑर्बन सलग चौथ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेणार आहेत. तर सर्बियात ‘सर्बियन प्रोग्रेसिव्ह पार्टी’चे नेते अलेक्झांडर वुकिक सलग दुसर्‍यांदा राष्ट्राध्यक्ष होणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दोन्ही नेत्यांना अभिनंदनाचे संदेश पाठविले असून रशिया व या देशांमधील भागीदारी अधिकच मजबूत होईल, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. ऑर्बन व वुकिक यांना मिळविलेला विजय युरोपिय महासंघासमोरील अडचणी वाढविणारा ठरेल, असा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे.

युक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका व युरोपिय मित्रदेशांनी रशियाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. युरोपिय महासंघ तसेच नाटो युक्रेन मुद्यावरील आपली एकजूट दाखविण्याचा प्रयत्न करीत असून युक्रेनवरील हल्ला हा युरोपिय मूल्ये व लोकशाहीवरील हल्ला आहे, असे चित्र उभे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. युक्रेनची बाजू घेऊन महासंघ तसेच नाटोने रशियावर कठोर निर्बंधही लादले असून अनेक क्षेत्रांमधील सहकार्य बंद केले आहे. मात्र गेल्या काही दिवसात रशियाविरोधातील धोरणावरून युरोपातील मतभेद प्रकर्षाने समोर येत आहेत. या मतभेदांच्या पार्श्‍वभूमीवर हंगेरी व सर्बिया या दोन्ही देशांमधील निवडणूक लक्ष वेधून घेणारी ठरली होती.

रशियासमर्थकहंगेरी हा देश महासंघ व नाटो दोन्ही संघटनांचा सदस्य आहे. सर्बियाने महासंघाच्या सदस्यत्वासाठी अर्ज केला असून नाटोला ठाम विरोध दर्शविला आहे. पण दोन्ही देश युरोपिय देश असल्याने महासंघ व नाटो दोन्ही संघटनांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन २०१० सालापासून सत्तेवर असून देशावरील आपली पकड अधिकाधिक घट्ट करण्यात त्यांनी यश मिळविले आहे. हे करताना त्यांनी रशिया व चीन या दोन्ही देशांशी सहकार्य वाढविण्याची भूमिका घेतली होती.

युक्रेन संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांची ही भूमिका महासंघ व नाटो दोघांसाठी अडचणीची ठरली आहे. त्यामुळे हंगेरीत निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर अमेरिका व युरोपिय माध्यमांमध्ये ऑर्बन यांना देशांतर्गत होणार्‍या विरोधाच्या बातम्यांना विशेष प्रसिद्धी दिली जात होती. काही विश्‍लेषक तसेच अभ्यासगटांनी त्यांच्या पराभवाचे अंदाजही वर्तविले होते. मात्र युरोप व अमेरिकी विरोधकांना धक्का देत व्हिक्टर ऑर्बन यांनी ५३ टक्क्यांहून अधिक मते मिळवून विजय मिळविला. आपला विजय चंद्रावर राहणार्‍यांना तसेच ब्रुसेल्समध्ये वास्तव्य करणार्‍यांनाही दिसला असेल, असा टोला ऑर्बन यांनी विजयानंतर लगावला.

सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुकिक हेदेखील रशियासमर्थन नेते म्हणून ओळखण्यात येतात. इंधनवाहिनी, नाटोशी संबंध तसेच लष्करी सहाय्य अशा अनेक मुद्यांवर त्यांनी रशियाचे सहकार्य घेण्यावर भर दिला आहे.

leave a reply