विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे जर्मनीकडून रशियाची संपत्ती जप्त करण्याचा प्रस्ताव

बर्लिन – गेल्या अडीच महिन्यांपासून युक्रेनविरोधात युद्ध पुकारणाऱ्या रशियाची संपत्ती जप्त करून या देशाला राजकीय, आर्थिकदृष्ट्या एकटे पाडावे, असा प्रस्ताव जर्मनीचे वित्तमंत्री ख्रिस्तियान लिंडनर यांनी ठेवला. त्याचबरोबर रशियन संपत्तीचा वापर युक्रेन युद्धातील निर्वासितांसाठी किंवा युक्रेनच्या लष्करी सहाय्य पुरविण्यासाठी करावा, याचे देखील जर्मनीने समर्थन केले. पण रशियाविरोधात कारवाई करताना आपण आंतरराष्ट्रीय नियमांचा आदर करावा, असे लिंडनर यांनी सुचविले आहे. दरम्यान, देशांतर्गत राजकीय विरोधकांच्या वाढत्या टीकेमुळे चॅन्सेलर शोल्झ यांच्या सरकारला रशियाविरोधात ही भूमिका स्वीकारावी लागल्याचे युरोपमधील आघाडीच्या वृत्तवाहिन्या सांगत आहेत.

रशियाची संपत्ती

रशियावरील निर्बंध अधिक कठोर करण्यासाठी पाश्चिमात्य देश एकत्र येत आहेत. या पार्श्वभूमीवर, युरोपिय महासंघ आणि जी7 सदस्य देशांची विशेष बैठक पार पडणार आहे. युरोपमधील रशियन सेंट्रल बँकेची खाती गोठवून त्यातील रक्कम युक्रेनच्या निर्वासितांसाठी वापरण्याबाबत या बैठकीत निर्णय होऊ शकतो. त्याचबरोबर युरोपातील रशियन उद्योजक, अब्जाधीशांची संपत्ती जप्त करण्यावरही निर्णय घेतला जाईल.

जर्मनीमधील ‘ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन-सीडीयू’ या मुख्य विरोधी पक्षाने देखील ही मागणी उचलून धरली आहे. चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांच्या सरकारने रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे जर्मनीतील सहकारी व संबंधितांवर कारवाई करावी. त्यांची संपत्ती गोठवावी, अशी मागणी सीडीयूने केली आहे. त्याचबरोबर जर्मन सरकारने युक्रेनला लष्कराला रशियाविरोधी युद्धासाठी तातडीने लष्करी सहाय्य रवाना करावे, असे सुचविले होते.

रशियाची संपत्तीपण चॅन्सेलर शोल्झ यांचे सरकार जर्मनीतील रशिया समर्थकांवर किंवा रशियन संपत्तीवर कारवाई करीत नसल्याची टीका सीडीयू करीत आहे. युक्रेनला शस्त्रपुरवठा करण्यातही जर्मन सरकार जाणूनबुजून विलंब करीत असल्याचा आरोप सीडीयूने केला आहे. अशा परिस्थितीत, जर्मनीचे वित्तमंत्री लिंडनर यांनी युरोपिय महासंघासमोर रशियाची संपत्ती जप्त करण्याचा प्रस्ताव सादर केल्याचे दिसत आहे. युक्रेनविरोधात युद्ध छेडण्याची रशियाला किंमत मोजायला लावली पाहिजे, असे लिंडनर यांनी म्हटले आहे. पण ही कारवाई करताना आपण नियमांचे उल्लंघन करू नये, असे जर्मन वित्तमंत्र्यांनी सुचविले आहे.

दरम्यान, जर्मन चॅन्सेलर शोल्झ हे मार्क्सवादी विचारांचे असल्याचा दावा युरोपातील विश्लेषक करीतआहेत. त्यामुळे शोल्झ रशियाविरोधात भूमिका घेण्यास कचरत असल्याचे या विश्लेषकांचे म्हणणे आहे. शोल्झ यांचा जन्म वेस्ट जर्मनीतील असल्याचे विश्लेषक लक्षात आणून देत आहेत. शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेने युरोपमध्ये आपली क्षेपणास्त्र तैनात केली होती. त्यावेळी शोल्झ यांनी त्याला कडाडून विरोध केला होता, याची आठवण हे विश्लेषक करून देत आहेत.

leave a reply