तेहरान/पॅरिस – इराणमधील इस्लामी क्रांतीचा वृक्ष मोठा झाला असून तो मूळासकट उखडून टाकण्याचा विचारही कुणी करू नये, अशी घोषणा इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांनी केले. तसेच पाश्चिमात्यांच्या इशाऱ्यावर इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर कारवाई करण्याचा इशारा खामेनी यांनी दिला. यामुळे खवळलेल्या काही नेत्यांनी देशव्यापी निदर्शनांची हाक दिली आहे. या नव्या आंदोलनाद्वारे इराणच्या राजवटीच्या अंताचा आरंभ करण्याचे आवाहन या नेत्यांनी केले आहे.
महिन्याभरापूर्वी माहसा अमिनी या कुर्द तरुणीचा इराणी सुरक्षा यंत्रणेच्या कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला. हिजाबसक्तीच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या माहसा अमिनीचा इराणच्या राजवटीने बळी घेतल्याचा आरोप करून इराणमध्ये मोठे आंदोलन भडकले. शाळा, कॉलेजमधील विद्यार्थीनी तसेच तरुणींचा मोठा समावेश असलेल्या या आंदोलनाला इराणमधील सर्वच गटांकडून पाठिंबा मिळत आहे. या समर्थकांमध्ये इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष अली अकबर रफ्संजानी यांच्या मुलीचा समावेश होता. तर इराणच्या राजवटीचा सर्वात मोठा प्रभाव असलेल्या शहरांमध्येही हिजाबसक्तीच्या विरोधात जोरदार निदर्शने झाल्यामुळे सर्वोच्च नेते खामेनी यांना हादरा बसल्याचा दावा केला जातो.
गेल्या चार आठवड्यांपासून भडकलेली ही निदर्शने चिरडण्यासाठी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स, बसिज मिलिशिया आणि पोलीस यंत्रणेने अतिशय आक्रमक कारवाई केली. यामध्ये किमान 108 जणांचा बळी गेल्याचे इराणी माध्यमांचे म्हणणे आहे. पण इराणी सुरक्षा यंत्रणेच्या कारवाईत 224 जणांचा बळी गेला असून यामध्ये 23 अल्पवयीन विद्यार्थी-विद्यार्थीनींचा समावेश असल्याचा दावा पाश्चिमात्य मानवाधिकार संघटना करीत आहेत. या निदर्शनांना आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळू नये, यासाठी गेल्या काही दिवसांपासून इराणच्या राजवटीने प्रमुख शहरांमधील इंटरनेट सुविधा बंद केली आहे.
त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून इराणमधील आंदोलनाचे तपशील जगासमोर आले नव्हते. अशावेळी इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांनी शुक्रवारी देशवासियांना संबोधित करताना, आपली राजवट कोसळणार नसल्याचे ठासून सांगितले. तसेच आपल्या देशात भडकेलेल्या या दंगलीसाठी अमेरिका व इस्रायल जबाबदार असल्याचा ठपका खामेनी यांनी ठेवला. इराणच्या शत्रू देशांच्या इशाऱ्यांवर हिंसा भडकविणाऱ्या दंगलखोरांवर कारवाई करणार असल्याची घोषणा खामेनी यांनी केली.
यानंतर इराणचे जवान विद्यार्थीनींवर करीत असलेल्या अत्याचाराचे व्हिडिओज् देखील समोर आल्यामुळे सर्वसामान्य इराणी नागरिकांमध्ये संतापाची लहर उसळली आहे. इराणच्या राजवटीने या व्हिडिओमधील जवानांवर कारवाई करण्याचे जाहीर केले. पण यामुळे खवळलेल्या काही नेत्यांनी इराणच्या राजवटीविरोधात देशव्यापी निदर्शनांसाठी आवाहन केले आहे. इराणच्या राजवटीच्या अंताच्या आरंभासाठी प्रत्येक इराणी नागरिकाने रस्त्यावर उतरून या निदर्शनात सहभागी व्हावे, असे या नेत्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, येत्या काही तासात युरोपिय महासंघ इराणच्या राजवटीवर निर्बंधांची कारवाई करू शकतो. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी देखील इराणवरील निर्बंधांची शक्यता वर्तविली आहे. पाश्चिमात्य देशांनी इराणवर निर्बंध लादले तर त्याचे थेट परिणाम दोन्ही गटांमध्ये सुरू असलेल्या अणुकरारावर होतील, असा दावा केला जातो.