इंधनवायूच्या आघाडीवर कतार रशियाची जागा घेऊ शकणार नाही

- युरोपला कतारच्या ऊर्जामंत्र्यांची समज

रशियाची जागादोहा – रशियाच्या इंधनक्षेत्रावर निर्बंध लादण्याच्या मुद्यावर युरोपिय महासंघात अजूनही एकमत झालेले नाही. त्यातच रशियाला पर्याय म्हणून युरोपिय देशांनी आपली इंधनाची गरज पूर्ण करण्यासाठी कतारला आवाहन केले असून यामध्ये यश मिळाल्याचा दावा पाश्‍चिमात्य माध्यमे करीत आहेत. पण युरोपियन देशांसाठी इंधनवायूचा सर्वात मोठा निर्यातदार देश म्हणून कतार रशियाची जागा घेऊ शकत नाही, अशी कबुली कतारच्या ऊर्जामंत्र्यांनी दिली. त्याचबरोबर गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या संघर्षात आपला देश कुठल्याही गटाचे समर्थन करणार नसल्याचे कतारने स्पष्ट केले.

जागतिक बाजारपेठेत पुरविल्या जाणार्‍या एकूण इंधनवायूपैकी ३० ते ४० टक्के हिस्सा एकट्या रशियाचा आहे. तर युरोपिय महासंघ आपल्या एकूण इंधवायूच्या आयातीपैकी ४० टक्के इतक्या प्रमाणात रशियावर अवलंबून आहे. त्यामुळे युरोपिय देशांसाठी रशिया हा सर्वात मोठा इंधन निर्यातदार देश ठरतो. युरोपसाठी रशियातून युक्रेनमार्गे इंधनवायूचा पुरवठा केला जात होता. अशा परिस्थितीत, रशिया-युक्रेन युद्ध पेटल्यामुळे युरोपिय देशांना मिळणारा इंधनवायूचा पुरवठा धोक्यात आला आहे.

रशियाची जागाया पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेने सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील ओपेक संघटनेला युरोपिय देशांसाठी इंधनाचे उत्पादन वाढविण्याचे आवाहन केले होते. पण सौदीने हौथी बंडखोरांच्या वाढत्या हल्ल्यांकडे लक्ष वेधून आपली या आघाडवर आपली असमर्थता व्यक्त केली होती. गेल्या आठवड्यात जर्मनीच्या अर्थमंत्र्यांनी कतारचा दौरा करून इंधनवायूच्या पुरवठ्याबाबत चर्चा केली खरी. पण इंधनवाहू जहाजे बंदरात लावून इंधन उतरवून घेण्यासाठी जर्मनीमध्ये टर्मिनल्स नसल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे कतारकडून इंधनवायूचा पुरवठा सुरू करण्यास जर्मनीला प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे उघड झाले होते.

युरोपच्या दौर्‍यावर आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि युरोपिय महासंघाच्या अध्यक्षा उर्सुला व्हॉन डेर लेयन यांनी शुक्रवारी इंधन भागीदारीची घोषणा केली. रशियन इंधनावरील युरोपचे अवलंबित्व कमी करण्यासाठी बायडेन प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचा दावा केला जातो. पण रशियाच्या इंधनक्षेत्रावर निर्बंध लादण्याच्या मुद्यावर जर्मनी, नेदरलॅण्डस्, ऑस्ट्रिया यासारख्या महत्त्वाच्या युरोपिय देशांचा विरोध अजूनही कायम आहे.

अशा परिस्थितीत, अमेरिकन वृत्तवाहिनीशी बोलताना कतारचे ऊर्जामंत्री ‘साद शेरीदा अल-काबी’ यांनी इंधनवायूचा सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या रशियाची जागा कतार घेऊ शकत नसल्याचे मान्य केले. कतार युरोपिय देशांना इंधनवायूचा पुरवठा करू शकतो, पण त्यांची मागणी पूर्ण करू शकत नाही, असे काबी यांनी स्पष्ट केले. रशियाला पर्याय शोधण्याच्या घोषणा करणार्‍या बायडेन प्रशासन व युरोपिय महासंघासाठी हा मोठा धक्का ठरतो.

leave a reply