लिमा/बीजिंग – चीनची कोरोना लस साथीविरोधात फारशी प्रभावी ठरत नसल्याने त्यानंतर पाश्चात्य देशांनी विकसित केलेल्या लसीचा ‘बूस्टर डोस’ देणे आवश्यक आहे, अशी शिफारस संशोधकांनी केली आहे. लॅटिन अमेरिकेतील पेरु या देशात झालेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. चीनने लस विकसित केल्यानंतर ती आयात करणाऱ्या देशांमध्ये पेरु आघाडीवर होता. मात्र चीनची लस दिल्यानंतरही पेरुतील कोरोनाची साथ आटोक्यात येत नसल्याने त्यावर स्वतंत्ररित्या संशोधन करण्यात आले होते. त्याचे निष्कर्ष चीनच्या ‘व्हॅक्सिन डिप्लोमसी’ला मिळालेला नवा धक्का मानला जातो.
पेरुच्या आरोग्य विभागाने चिनी लसीबद्दलचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. त्यात, चीनच्या ‘सिनोफार्म’ने तयार केलेल्या लसीचे दोन डोस दिल्यानंतरही कोरोनाच्या साथीविरोधात जेमतेम 50 टक्केच सुरक्षा मिळत असल्याचे समोर आले आहे. फेब्रुवारी ते जून महिन्यात पेरुच्या आरोग्ययंत्रणेतील लाखो कर्मचारी व स्वयंसेवकांना चीनची लस देण्यात आली होती. त्यातील जवळपास चार लाख जणांचा अभ्यास करण्यात आला. यातील अनेकांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पेरुने आता चीन सोडून इतर देशांनी विकसित केलेल्या लसीचा ‘बूस्टर डोस’ देण्याचा निर्णय घेतला आहे.
2019 सालच्या अखेरीस चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना साथीवर पहिली लस तयार करण्याचा दावा चीनकडूनच करण्यात आला होता. परदेशी कंपन्यांच्या चाचण्या सुरू असतानाच चीनने आपल्या नागरिकांना लस देण्यास सुरुवातही केली होती. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ला दिलेल्या माहितीत चीनने आपली लस 78 टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचे दावे केले होते. लस विकसित केल्यानंतर जगातील विविध देशांना तब्बल 80 कोटी लसींचा पुरवठा करु, अशी घोषणा चीनच्या सत्ताधारी राजवटीने केली होती. त्यामुळे आरोग्य संघटनेने चीनच्या लसींना मान्यता दिली होती.
आपल्या आर्थिक व राजनैतिक प्रभावाचा वापर करून चीनने आग्नेय आशिया, आखात, लॅटिन अमेरिका व आफ्रिकी देशांमध्ये लस पुरविण्याचे करार करून पुरवठाही सुरू केला होता. मात्र काही महिन्यांनी चीनची लस साथीचा प्रसार रोखण्यात फारशी प्रभावी ठरत नसल्याचे अहवाल समोर येऊ लागले आहेत. आफ्रिकेतील सेशल्स तसेच बाहरिन या आखाती देशांसह लॅटिन अमेरिकेतील चिलीमध्ये चीनची लस वापरल्यानंतरही साथीचा संसर्ग पुन्हा वेगाने वाढत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर जून महिन्यात, मध्य अमेरिकेतील छोटासा देश म्हणून ओळखण्यात येणाऱ्या कोस्टारिकानेही चीनची कोरोना लस नाकारण्याचा निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ आता लॅटिन अमेरिकेतील पेरु या देशात झालेले संशोधन समोर आले आहे.
पेरुच्या सरकारने आपल्या नागरिकांना ‘फायझर’ किंवा ‘ॲस्ट्राझेनेका’ कंपनीच्या लसीचा ‘बूस्टर डोस’ देण्याची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भातील प्राथमिक चाचण्याही झाल्याचे सांगण्यात येते. पेरु तसेच लॅटिन अमेरिकी देशांमध्ये ‘डेल्टा’ तसेच ‘लॅम्बडा’ हे कोरोनाचे नवे ‘व्हेरिअंट’ वेगाने पसरत आहेत. हे नवे प्रकार चिनी लसींना दाद देत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे नजिकच्या काळात जगाच्या विविध देशांमधील चिनी लसींची मागणी घटून दुसऱ्या देशांच्या लसींना प्राधान्य मिळेल, असे संकेत मिळू लागले आहेत. ही बाब चीनच्या कम्युनिस्ट राजवटीच्या ‘व्हॅक्सिन डिप्लोमसी’ला चांगलाच हादरा देणारी ठरली आहे.