विक्रमी महागाईमुळे ‘फूड बँक्स’वर अवलंबून असणाऱ्या अमेरिकी नागरिकांमध्ये वाढ

inflation-increaseवॉशिंग्टन – अमेरिकेत भडकलेल्या विक्रमी महागाईचा जबरदस्त फटका सामान्य अमेरिकी जनतेला बसत आहे. महागाई, बेरोजगारी व मंदी यांना तोंड देणाऱ्या अमेरिकी नागरिकांनी आता आपला मोर्चा फूड बँकांकडे वळविल्याचे समोर येत आहे. गेल्या काही महिन्यात स्वयंसेवी तसेच सामाजिक संघटनांकडून चालविण्यात येणाऱ्या फूड बँक्समधील नागरिकांची संख्या 20 टक्क्यांनी वाढली आहे. त्याचवेळी घरातील खर्च कमी करण्यासाठी अमेरिकी नागरिकांनी सुपरमार्केटकडेही पाठ फिरविली असून ‘डॉलर स्टोअर’चा वापर वाढविल्याचे सर्वेेक्षणातून समोर आले.

राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या चुकीच्या धोरणांमुळे अमेरिकेत गेले वर्षभर महागाईत सातत्याने वाढ होत आहे. या वाढत्या महागाईमुळे अमेरिकी जनतेची बचत मोठ्या प्रमाणात घटल्याचे गेल्याच महिन्यात समोर आले होते. गेल्या सहा महिन्यात अमेरिकी नागरिकांना आपल्या आपत्कालिन बचतीतील (रेनी डे सेव्हिंग्ज्‌‍) तब्बल 114 अब्ज डॉलर्सची रक्कम खर्च करावी लागल्याचे उघड झाले. त्याचवेळी दर महिन्याला वाढणाऱ्या महागाईमुळे अमेरिकी नागरिक महिन्याअखेरीस मिळकतीच्या जेमतेम पाच टक्के इतकीच बचत करु शकतो, अशी माहिती ‘फेडरल रिझर्व्ह’च्या अहवालात देण्यात आली होती. अमेरिकी नागरिकांच्या बचत खात्यात असणारी सरासरी रक्कमदेखील नऊ हजार डॉलर्सने घटल्याची माहिती वित्तसंस्थांनी दिली.

inflationबचत घटल्याने अमेरिकी नागरिकांनी आपल्या दैनंदिन खर्चालाही कात्री लावण्यास सुरुवात केली आहे. अनेक अमेरिकी कुटुंबांनी घरातील एक वेळचे जेवण बंद केले असून त्यासाठी आता फूड बँक्सचा आधार घेण्यात येत आहे. अमेरिकेत चालविण्यात येणाऱ्या जवळपास 200 फूड बँक्समधील 45 टक्के फूड बँक्सनी आपल्याकडे सहाय्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे सांगितले. काही फूड बँक्समध्ये ही वाढ जवळपास 20 टक्के इतकी आहे. अनेक ‘फूड बँक्स’ आपले बजेट कोलमडत असल्याची तक्रार करीत आहेत. फूड बँकांमध्ये वाढणारी गर्दी सर्वसामान्य अमेरिकी नागरिक तसेच कुटुंबांची हतबलता दाखविणारी आहे, असा दावा विश्लेषक करीत आहेत.

अमेरिकेच्या ‘डिपार्टमेंट ऑफ ॲग्रीकल्चर’ने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास चार कोटी नागरिकांना आवश्यक अन्नधान्यापासून वंचित रहावे लागत आहे. विक्रमी महागाईमुळे यात सातत्याने वाढ होत असल्याचा दावाही करण्यात आला. जून महिन्यात अमेरिकेतील महागाई निर्देशांक 9.1 टक्के नोंदविण्यात आला. ही गेल्या चार दशकांमधील सर्वाधिक वाढ ठरली आहे. अमेरिकेतील अन्नधान्याच्या किंमतीमध्ये आठ ते 15 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर इंधनाचे दर जवळपास 60 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याचवेळी आर्थिक मंदीमुळे अमेरिकेतील सामान्य नागरिकांच्या नोकऱ्याही धोक्यात येत असल्याचे संकेत मिळाले आहेत. खर्च कमी करण्यासाठी अमेरिकी नागरिकांनी मोठ्या रिटेल स्टोअर्स व सुपरमार्केटऐवजी एका डॉलरमध्ये उत्पादने उपलब्ध करून देणाऱ्या ‘डॉलर्स स्टोअर्स’चा आधार घेण्यास सुरुवात केल्याचेही समोर येत आहे.

वाढती महागाई व अर्थव्यवस्थेतील मंदी यामुळे अमेरिकी जनतेत बायडेन प्रशासनाविरोधातील नाराजीही मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. गेल्याच महिन्यात प्रसिद्ध झालेल्या एका सर्वेक्षणात 88 टक्के मतदारांनी देश चुकीच्या मार्गावर चालल्याचे म्हटले आहे. तर 54 टक्के मतदारांनी अमेरिकी मध्यमवर्गाला बायडेन यांच्या धोरणाचा काडीचाही फायदा झाला नसल्याची टीका केली होती.

leave a reply