मॉस्को/काबुल – युक्रेनमधील लष्करी मोहिमेसाठी रशिया एकेकाळी ‘अफगाणिस्तान नॅशनल आर्मी’चा भाग असलेल्या अफगाणी कमांडोज्ची भरती करीत असल्याचा दावा अमेरिकी माध्यमांनी केला आहे. रशियातील खाजगी लष्करी कंत्राटदार असलेल्या ‘वॅग्नर ग्रुप’कडून ही प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे माध्यमांनी म्हटले आहे. अमेरिकी जर्नल ‘फॉरेन पॉलिसी’ तसेच ‘असोसिएटेड प्रेस’ या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले.
रशिया-युक्रेन युद्धात रशियन लष्कराला मोठ्या प्रमाणात जीवितहानी सहन करावी लागल्याचे दावे युक्रेनसह पाश्चिमात्य देशांकडून करण्यात येत आहेत. या जीवितहानीमुळे रशियाने गेल्या महिन्यात लष्करात नव्या भरतीची प्रक्रिया राबविल्याचे तसेच चेचेन तुकड्या व ‘वॅग्नर ग्रुप’चा वापर वाढविल्याचेही सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वी रशियाने सिरिया व इतर देशांमध्ये तैनात केलेल्या लष्करी तुकड्यांमधून काही पथके माघारी बोलावल्याचेही समोर आले होते. या पार्श्वभूमीवर अफगाण कमांडोज्च्या भरतीचा दावा लक्ष वेधून घेणारा ठरतो.
गेल्या वर्षी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर हजारो अफगाणी जवानांवर बेकारीची वेळ ओढवली. अमेरिका व ब्रिटनसह इतर पाश्चिमात्य देशांनी प्रशिक्षण दिलेल्या या जवानांना आश्रय देण्याचे संबंधित देशांनी नाकारले होते. त्याचवेळी तालिबानशी बोलणी करताना या जवानांच्या सुरक्षेकडेही दुर्लक्ष करण्यात आले. तालिबानची राजवट प्रस्थापित झाल्यानंतर तालिबानच्या पथकांनी अफगाणी जवान व त्यांच्या कुटुंबांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेकडो जवानांनी इराणसह इतर मध्य आशियाई देशांमध्ये आश्रय घेतला. मात्र त्यांच्याकडे पैसा व कुटुंबाच्या सुरक्षेची हमी या दोन्ही गोष्टी नसल्याने शेकडो जवान हतबल झाल्याचे सांगण्यात येते.
या पार्श्वभूमीवर रशियाच्या वॅग्नर ग्रुपने प्रति महिना दीड हजार डॉलर्स, रशियन नागरिकत्व व कुटुंबाच्या सुरक्षेची हमी असा प्रस्ताव अफगाणी कमांडोज्ना दिल्याचे समोर आले आहे. इराणमध्ये आश्रय घेतलेल्या जवळपास चारशे अफगाण कमांडोज्नी हा प्रस्ताव स्वीकारला असून त्यातील काही रशियाला रवानाही झाले आहेत. रशियात वास्तव्यास असणाऱ्या एका अफगाणी अधिकाऱ्याने यासाठी प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. अफगाणी लष्करात काम केलेल्या माजी अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. तालिबानची राजवट आल्यानंतर दुसऱ्या देशात आश्रय घेतलेल्या तसेच अफगाणिस्तानात लपून दिवस काढणाऱ्या कमांडोज्ची संख्या जवळपास १० ते २० हजारांच्या आसपास आहे. यातील हजारांहून अधिक कमांडोज्शी संपर्क साधून प्रस्ताव दिल्याचे अमेरिकी माध्यमांनी म्हटले आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाने यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. तर ‘वॅग्नर ग्रुप’ने अशा प्रकारचे वृत्त खोडसाळपणा असल्याचे बजावले आहे.