वॉशिंग्टन – अणुकरार मार्गी लावायचा असेल तर अमेरिकेने इराणला नुकसानभरपाई द्यावी. तसेच रिव्होल्युशनरी गार्ड्सला दहशतवादी संघटनेतून वगळावे, अशा शर्ती इराणने बायडेन प्रशासनासमोर ठेवल्या आहेत. अणुकरारासाठी धडपडत असलेले बायडेन प्रशासन यासाठीही तयार झाल्याचा दावा केला जातो. पण अणुकरारासाठी रिव्होल्युशनरी गार्ड्सला निर्बंधांमधून सवलत दिली तर अमेरिकन नागरिक आणि अमेरिकेच्या सहकारी देशांवरील इराणचे हल्ले वाढतील, असा इशारा अमेरिकेच्या लष्करी गुप्तचर संस्थेचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल स्कॉट बेरियर यांनी दिला.
अमेरिका व इराण यांच्यात व्हिएन्ना येथे सुरू असलेल्या वाटाघाटी रखडल्या आहेत. त्या मार्गी लावण्यासाठी गेल्या आठवड्यात युरोपिय महासंघाच्या विशेष प्रतिनिधींनी इराणला भेट दिली होती. यावेळी इराणने अणुकरार मार्गी लावण्यासाठी अमेरिकेसमोर नव्या शर्ती ठेवल्या होत्या. इराणच्या या मागण्यांवर अमेरिकेतून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यात सत्ताधारी डेमोक्रॅट पक्षातच अणुकराराबाबतचे मतभेद समोर आले आहेत.
अणुकरारासाठी इराणची मागणी मान्य करून रिव्होल्युशनरी गार्ड्सला दहशतवादी संघटनेच्या यादीतून वगळण्याच्या बायडेन प्रशासनाच्या भूमिकेला डेमोक्रॅट पक्षातील उदारमतवादी सिनेटर्स पाठिंबा देत आहेत. तर काही डेमोक्रॅट सिनेटर्स रिव्होल्युशनरी गार्ड्सला दहशतवादी संघटनेच्या यादीत कायम ठेवण्यावर ठाम आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी मात्र सिनेटच्या चौकशी समितीसमोर बोलताना इराणची शर्त मान्य करण्याची तयारी दाखविली होती.
रिव्होल्युशनरी गार्ड्सला दहशतवादी संघटनेच्या यादीत ठेवून अमेरिकेला विशेष फायदा झालेला नाही. याउलट इराणच्या संघटनेवर बंदी कायम ठेवली तर अणुकरार रखडेल, असा दावा परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी केला. यामुळे बायडेन प्रशासन अणुकरारासाठी रिव्होल्युशनरी गार्ड्सला दहशतवादी संघटनेच्या यादीतून वगळून निर्बंधातून सवलत देणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पण अमेरिकेच्या लष्करी गुप्तचर संस्थेचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल बेरियर यांनी यावरुन बायडेन प्रशासनाला नवा इशारा दिला.
रिव्होल्युशनरी गार्ड्सवरील निर्बंध शिथिल केले तर या क्षेत्रातील अमेरिकन जवान आणि अमेरिकेच्या सहकारी देशांवरील इाणचे हल्ले वाढतील, असे लेफ्टनंट जनरल बेरियर यांनी बजावले. इराणच्या अणुकार्यक्रमापासून जागतिक सुरक्षेला धोका आहे. त्याचबरोबर इराण आणि इराणशी संलग्न दहशतवादी संघटनांपासूनही आखाती देशांना धोका आहे, याकडे बेरियर यांनी लक्ष वेधले.
तर राष्ट्रीय गुप्तचर संस्थेच्या अध्यक्षा हेन्स यांनी इराण आखातातील अमेरिकेच्या हितसंबंधांसाठी धोकादायक ठरत असल्याची आठवण करून दिली. त्याचबरोबर येत्या काळात इस्रायल आणि इराणमध्ये संघर्ष भडकू शकतो, असा इशारा हेन्स यांनी दिला.
बेरियर आणि हेन्स यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे इराणच्या मागण्या मान्य करणे बायडेन प्रशासनासाठी तितकेसे सोपे राहिलेले नाही. त्यातच युक्रेनचे युद्ध पेटल्यानंतर रशियाच्या इंधनावरील इतर देशांचे अवलंबित्त्व कमी करण्यासाठी अमेरिकेला इराणच्या इंधनाची गरज आहे. यासाठी बायडेन प्रशासनाची धडपड सुरू असून ही बाब इराणच्या लक्षात आलेली आहे. त्याचा शक्य तितका लाभ घेऊन इराणने अणुकरारासाठी अमेरिकेसमोर अधिक ठामपणे नव्या शर्ती मांडल्याचे दिसत आहे.
याबरोबरच इराणची आखाती क्षेत्रातील आक्रमकता वाढत असल्याचे या देशाच्या इराकमधील हल्ल्यांमुळे उघड झाले आहे. त्याचवेळी इराण इस्रायलला देखील उघडपणे सर्वनाशाचे इशारे देत आहे. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, ही बाब अमेरिकेचे लोकप्रतिनिधी बायडेन प्रशासनाच्या लक्षात आणून देत आहेत.