अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत प्रतिनिधीगृहात रिपब्लिकन्सची सरशी, मात्र सिनेटचा निर्णय अधांतरी

- रिपब्लिकन पार्टी व माध्यमांकडून ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र

रिपब्लिकन्सची सरशीवॉशिंग्टन – अमेरिकेत ८ नोव्हेंबर रोजी झालेल्या मध्यावधी निवडणुकांमधील निकालाचे चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. संसदेचे कनिष्ठ सभागृह असणाऱ्या लोकप्रतिनिधीगृहात रिपब्लिकन पार्टीची सरशी होताना दिसत असून डेमोक्रॅट पक्षाने बहुमत गमावल्याचे दिसत आहे. तर वरिष्ठ सभागृह असणाऱ्या सिनेटमध्ये बहुमताचा निर्णय पुढील महिन्यापर्यंत अधांतरी राहणार असल्याचे समोर आले. अमेरिकेतील विविध राज्यांमधील गव्हर्नरपदांसाठी झालेल्या लढतीतही रिपब्लिकन पार्टीला चांगले यश मिळाले आहे. तरीही राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या धोरणांविरोधात प्रचंड नाराजी असतानाही रिपब्लिकन पक्ष मोठा विजय मिळविण्यात अपयशी ठरल्याने माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना धारेवर धरले जात आहे. त्याचवेळी फ्लोरिडा प्रांताचे गव्हर्नर रॉन डेसँटिस हे रिपब्लिकन पक्षाचे भविष्य असल्याचे चित्र माध्यमे तसेच सोशल मीडियात रंगविण्यात येत आहे.

रिपब्लिकन्सची सरशीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची चुकीची धोरणे व अकार्यक्षमता या पार्श्वभूमीवर बायडेन प्रशासनाविरोधात तीव्र लाट निर्माण झाल्याचे निवडणूकपूर्व सर्वेक्षणे व अहवालांमधून समोर आले होते. मंगळवारी झालेल्या मतदानातूनही बायडेन व डेमोक्रॅट पार्टीला जबर दणका मिळेल व अमेरिकी संसदेत रिपब्लिकन पार्टीची ‘रेड वेव्ह’ दिसून येईल, अशी भाकिते करण्यात आली होती. मात्र मंगळवारी रात्रीपासून जाहीर होणाऱ्या निकालांनी ही भाकिते तसेच सर्वेक्षणे व अहवाल फसवे निघाल्याचे दाखवून दिले. यापूर्वी बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना डेमोक्रॅट पार्टीला तब्बल ६०हून अधिक जागांचे नुकसान झाले होते. तर डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी असताना झालेल्या निवडणुकीत रिपब्ब्लिकन पार्टीला जवळपास ४० जागांवर दणका बसला होता. बायडेन यांच्याविरोधात तीव्र असंतोष असतानाही डेमोक्रॅट पार्टीचे इतके मोठे नुकसान झाले नसल्याचे निकालांमधून समोर येत आहे.

रिपब्लिकन्सची सरशीगुरुवारी सकाळपर्यंत जाहीर झालेल्या निकालांनुसार संसदेच्या प्रतिनिधीगृहातील ४३५ जागांपैकी २१० जागांवर रिपब्लिकन पार्टीची सरशी झाली आहे. तर डेमोक्रॅट पार्टीला १९२ जागा मिळाल्या आहेत. अजून काही निकाल जाहीर होणे बाकी असून रिपब्लिकन पार्टी बहुमतासाठी आवश्यक असणाऱ्या २१८हून अधिक जागांवर विजय मिळवेल, असे सांगण्यात येते. मात्र सिनेटसाठी झालेल्या निवडणुकांनंतर रिपब्लिकन व डेमोक्रॅट या दोन्ही पक्षांना प्रत्येकी ४८ जागा मिळाल्या आहेत. चार जागांचे निकाल बाकी असून त्यातील जॉर्जिया प्रांतातील सिनेटच्या जागेसाठी पुढील महिन्यात फेरनिवडणूक होणार आहे. त्यामुळे सिनेटचे भवितव्य तोपर्यंत अधांतरी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रिपब्लिकन्सची सरशी‘रेड वेव्ह’ची भाकिते होत असतानाही डेमोक्रॅट पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. तर दुसऱ्या बाजूला रिपब्लिकन पक्षात ट्रम्प व ट्रम्पविरोधी गट यांचा संघर्ष ऐरणीवर येण्याचे संकेत मिळत आहेत. फ्लोरिडा प्रांतात दुसऱ्यांदा गव्हर्नर म्हणून निवडून आलेले रॉन डेसँटिस रिपब्लिकन पार्टीचे भविष्य असल्याचे दावे प्रसारमाध्यमे तसेच सोशल मीडियातून होऊ लागले आहेते. गेली काही वर्षे ट्रम्प यांचे समर्थक असणाऱ्या वृत्तवाहिन्या तसेच दैनिकांनीही उघडपणे ट्रम्प यांच्याविरोधात बोलण्यास सुरुवात केली आहे.

रिपब्लिकन पार्टीतील वरिष्ठ नेते, सल्लागार तसेच विश्लेषकांनी ट्रम्प हे पक्षासाठी समस्या बनल्याची टीका केली आहे. मात्र ट्रम्प यांनी आपल्याविरोधातील आरोप व टीका झिडकारली असून पुढील आठवड्यात २०२४ सालच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीसंदर्भात घोषणा करु, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.

leave a reply