भारतीय लष्कराकडून चीनच्या अपप्रचाराला मुखभंग करणारे प्रत्युत्तर

नवी दिल्ली – भारताच्या ताब्यातील गलवान व्हॅलीचा भाग आपल्या कब्जात आल्याचा आभास निर्माण करणाऱ्या चीनला भारतीय लष्कराने मुखभंग करणारे प्रत्युत्तर दिले. गलवान व्हॅलीमध्ये तिरंगा फडकाणाऱ्या भारतीय सैनिकांचा फोटोग्राफ लष्कराने प्रसिद्ध केला. हा फोटो 1 जानेवारी रोजी गलवान व्हॅलीमध्येच टिपण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यानंतर चीनच्या प्रचारयुद्धाची भारताने हवा काढून घेतल्याची जोरदार चर्चा भारतीय माध्यमे तसेच सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

भारतीय लष्कराकडून चीनच्या अपप्रचाराला मुखभंग करणारे प्रत्युत्तरनव्या वर्षाच्या सुरूवातीला चीनने गलवान व्हॅलीत आपल्या लष्कराचा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. चीनचा राष्ट्रध्वज गलवान व्हॅलीत फडकला असा दावा यात करण्यात आला होता. 2020 सालच्या ऑगस्ट महिन्यात लडाखच्या गलवान व्हॅलीत भारत व चीनच्या लष्कराची चकमक झाली होती. यात कर्नल संतोष बाबू यांच्यासह भारताने 20 सैनिक शहीद झाले होते. पण या संघर्षात चीनच्या लष्कराला याहून कितीतरी अधिक हानी सोसावी लागली, पण त्याची कबुली या घमेंडखोर देशाने कधीही दिली नाही. उलट या संघर्षात आपल्या लष्कराची सरशी झाल्याचे दावे चीन अजूनही ठोकत आहे. पण प्रत्यक्षात भारतीय सैन्याच्या दणक्याने चीनचे जवानांचा आत्मविश्‍वास खचल्याचे समोर आले होते. तेव्हापासूनच लडाखच्या एलएसीवर आपली सरशी होत असल्याचे चित्र उभे करणे ही चीनची गरज बनली आहे.

याच प्रयत्नाचा भाग म्हणून चीनने नव्या वर्षात गलवान व्हॅलीतला तो व्हिडिओ व फोटोग्राफही प्रसिद्ध केला. मात्र चीनच्या लष्कराने आपला राष्ट्रध्वज गलावनमध्ये संघर्ष झाला त्या ठिकाणी नाही, तर आपले नियंत्रण असलेल्या भागात फडकावल्याचे उघड झाले आहे. गलवानमध्ये जिथे संघर्ष झाला ती जागा चीनच्या लष्कराने राष्ट्रध्वज फडकावला तिथून दीड किलोमीटर दूर आहे, हे भारतीय पत्रकार व विश्‍लेषकांनी लक्षात आणून दिले. यानंतर चीनकडून केल्या जाणाऱ्या अपप्रचाराच्या विरोधात भारतात संताप व्यक्त करण्यात येत होता. मात्र मंगळवारी भारतीय लष्कराने गलवान व्हॅलीतील फोटोग्राफ प्रसिद्ध करून चीनच्या अपप्रचाराला मुखभंग करणारे प्रत्युत्तर दिले. हा फोटो गलवान व्हॅलीत 1 जानेवारी रोजीच टिपण्यात आला होता. यात भारतीय 30 सैनिक तिरंग्यासह नव्या वर्षाचे स्वागत करताना दिसत आहेत.

गलवान व्हॅलीबाबतची विपर्यास्त माहिती देण्याचा चीनचा डाव भारतीय लष्कराने हाणून पाडल्याचे बोलले जात आहे. विशेषतः सोशल मीडियावर भारतीयांनी अपप्रचार करणाऱ्या चीनची खिल्ली उडविल्याचे दिसत आहे.

leave a reply