इंधनक्षेत्रावरील निर्बंध व गुंतवणुकीत झालेली घट यामुळे टंचाई निर्माण होईल

सौदी अरेबियाच्या इंधनमंत्र्यांचा इशारा

saudi energy ministrरियाध – इंधनक्षेत्रावर लादण्यात येणारे निर्बंध व त्यातील अपुरी गुंतवणूक यामुळे पुढील काळात ऊर्जा क्षेत्रातील टंचाईचे संकट अधिक गंभीर होऊ शकते, असा इशारा सौदी अरेबियाचे इंधनमंत्री प्रिन्स अब्दुलअझिझ बिन सलमान अल सौद यांनी दिला. सौदीची राजधानी रियाधमध्ये आयोजित केलेल्या परिषदेत हा इशारा देतानाच, रशियावर लादलेले निर्बंध उलटू शकतात असेही सौदीच्या मंत्र्यांनी बजावले. रविवार पाच फेब्रुवारीपासून पाश्चिमात्य देशांनी रशियाच्या इंधननिर्यातीवर लादलेले नवे निर्बंध लागू होत आहेत. या पार्श्वभूमीवर सौदीच्या मंत्र्यांनी हा इशारा देणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

fuel sectorगेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय स्तरावरील इंधन तसेच वीजेच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या वाढीमुळे महागाईचा भडका उडाला असून पाश्चिमात्य देशांसह अनेक प्रमुख अर्थव्यवस्थांना त्याचा फटका बसला आहे. त्याचवेळी जगभरातील कोट्यावधी जनतेला ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस’च्या संकटालाही तोंड द्यावे लागत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून जागतिक अर्थव्यवस्था मंदावेल, अशी भाकिते वर्तविण्यात येत आहे. यासाठी रशिया-युक्रेन युद्ध कारणीभूत असल्याचे दावे पाश्चिमात्य विश्लेषक तसेच अभ्यासगटांकडून करण्यात येत आहे.

मात्र इंधनक्षेत्रातील आघाडीचा देश असणाऱ्या सौदीने हे दावे वारंवार खोडून काढले आहेत. इंधनदरांमधील वाढ, ऊर्जा संकट व महागाईचा भडका यासाठी पाश्चिमात्य देशांची धोरणेच जबाबदार असल्याचे सौदीकडून सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी जगातील आघाडीची इंधनकंपनी असणाऱ्या सौदीच्या ‘ॲराम्को’च्या प्रमुखांनीही यावर टिप्पणी केली होती. सध्या उद्भवलेल्या जागतिक ऊर्जा संकटासाठी युक्रेनमधील संघर्ष कारणीभूत नाही, तर इंधनक्षेत्रातील घटलेली गुंतवणूक तसेच अपुरे पर्याय व बॅकअप प्लॅन तयार नसणे ही प्रमुख कारणे आहेत, असा ठपका जगातील आघाडीची इंधनकंपनी ॲराम्कोचे प्रमुख अमिन नासेर यांनी ठेवला होता.

त्यानंतर आता सौदीच्या इंधनमंत्र्यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. निर्बंध व इतर प्रकारच्या कारवायांमुळे इंधनाची सर्वाधिक गरज असताना त्याची टंचाई जाणवू शकते, याकडे इंधनमंत्री प्रिन्स अब्दुलअझिझ बिन सलमान अल सौद यांनी लक्ष वेधले.

leave a reply