रोम – इटलीत रविवारी पार पडलेल्या संसदीय निवडणुकीत उजव्या विचारसरणीच्या ‘सेंट्रोडेस्ट्रा’ला बहुमत मिळाले आहे. या आघाडीचे नेतृत्त्व करणाऱ्या ‘ब्रदर्स ऑफ इटली’ या पक्षाला 26 टक्के मते मिळाली असून पक्षाच्या प्रमुख जॉर्जिआ मेलोनी पंतप्रधान म्हणून सूत्रे स्वीकारणार आहेत. इटलीच्या इतिहासातील त्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरतील. इटलीत उजव्या विचारसरणीच्या आघाडीला मिळालेल्या यशाचे हंगेरी व पोलंडसह फ्रान्स, जर्मनी व स्पेनमधील उजव्या गटाच्या नेत्यांनी स्वागत केले आहे. मात्र युरोपिय महासंघात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असून इटलीत उजव्या विचारसरणीला मिळालेले यश महासंघातील मतभेदांना अधिक खतपाणी घालणारे ठरेल, असा दावा विश्लेषक करीत आहेत.
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मारिओ द्रागी यांनी इटलीचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली होती. मवाळ व डाव्या विचारसरणीच्या पक्षांच्या समर्थनावर पंतप्रधान म्हणून काम करणाऱ्या द्रागी यांनी जुलै महिन्यात पदाचा राजीनामा दिला होता. ‘फाईव्ह स्टार मुव्हमेंट’ या पक्षाने अर्थसहाय्याच्या मुद्यावरून पाठिंबा काढून घेतल्याने त्यांना राजीनामा देणे भाग पडले होते. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष सर्जिओ मॅटारेला यांच्या आवाहनानंतरही द्रागी यांनी राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम राहून निवडणुकांची घोषणा केली होती.
रविवारी 25 सप्टेंबर रोजी इटलीतील निवडणुकांसाठी मतदान पार पडले. त्याचे निकाल हाती आले असून ‘ब्रदर्स ऑफ इटली’ या पक्षाच्या नेतृत्त्वाखाली स्थापन झालेल्या ‘सेंट्रोडेस्ट्रा’ला 44 टक्के मते मिळाली आहेत. त्यानुसार, इटलीतील कनिष्ठ सभागृहाच्या 400 जागांपैकी 225हून अधिक जागा या आघाडीकडे गेल्या आहेत. तर वरिष्ठ सभागृहातील 200पैकी 110हून अधिक जागा ‘सेंट्रोडेस्ट्रा’कडे असतील. इटलीत उजव्या विचारसरणीच्या आघाडीला अशा रितीने बहुमत मिळण्याची दुसऱ्या महायुद्धानंतरची पहिलीच वेळ ठरली आहे.
सेंट्रोडेस्ट्रा आघाडीत जॉर्जिआ मेलोनी यांच्या ‘ब्रदर्स ऑफ इटली’ पक्षाव्यतिरिक्त माजी अंतर्गत सुरक्षामंत्री मॅटिओ सॅल्व्हिनी यांच्या ‘द लीग’ व माजी पंतप्रधान सिल्विओ बर्लुस्कोनी यांच्या ‘फोर्जा इटालिआ’ या पक्षांचा समावेश आहे. या दोन्ही पक्षांना 17 टक्के मते मिळाली आहेत. मेलोनी यांच्या ‘ब्रदर्स ऑफ इटली’ पक्षाला मिळालेले यश ऐतिहासिक मानले जाते. 2012 साली स्थापन झालेल्या या पक्षाला गेल्या निवडणुकीत अवघी चार टक्के मते मिळाली होती. मात्र आता त्याने थेट 26 टक्क्यांपर्यंत घेतलेली झेप इटलीतील जनतेच्या बदलत्या मानसिकतेचे संकेत ठरतात. मेलोनी यांची पंतप्रधानपदासाठी होणारी निवडही त्याला दुजोरा देणारी ठरते.
‘गॉड, कंट्री ॲण्ड फॅमिली’ या घोषवाक्यासह प्रचार करणाऱ्या मेलोनी यांनी इटलीतील वाढते निर्वासित, महासंघाचा हस्तक्षेप व दांभिक डाव्या विचारसरणीचा कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे भविष्यात इटली व उदारमतवादी महासंघात जोरदार खटके उडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.