अमेरिकेत पोलिसांच्या हत्येच्या प्रकरणांमध्ये वाढ

- ‘एफबीआय’ची माहिती

‘एफबीआय’वॉशिंग्टन – अमेरिकेत ‘ऑन ड्युटी’ असणार्‍या पोलिस अधिकार्‍यांच्या हत्या होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याची माहिती तपासयंत्रणा ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ने दिली आहे. हत्यांच्या या घटना गेल्या २६ वर्षातील उच्चांक ठरला असून अवघ्या वर्षभरात हत्यांमध्ये तब्बल ५९ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. अमेरिकेच्या विविध शहरांमध्ये पोलिसांसाठीच्या आर्थिक तरतुदींमध्ये झालेली घट व त्यामुळे पोलीसदलावर आलेला ताण तसेच अमेरिकी नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल असलेली असंतोषाची भावना, हे घटक वाढत्या हत्यांसाठी कारणीभूत असू शकतात, असा दावा करण्यात येत आहे.

अमेरिकेची प्रमुख तपासयंत्रणा ‘एफबीआय’ने पोलीसांच्या हत्येच्या घटनांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार २०२१ साली अमेरिकेच्या पोलीसदलांमधील ७३ पोलीस अधिकार्‍यांच्या विशिष्ट हेतू बाळगून हत्या (फेलोनियस किलिंग्ज्) करण्यात आल्या. गेल्या वर्षी हीच संख्या ५०हून कमी होती. ‘ऑन ड्युटी’ पोलीस अधिकार्‍यांच्या अपघाताने किंवा चुकून हत्या होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. २०२१ साली अशा प्रकारच्या घटनांमध्ये ५६ पोलीस अधिकार्‍यांना प्राण गमवावे लागले. गेल्या वर्षी हीच संख्या ४६ इतकी होती.

‘एफबीआय’गेल्या काही वर्षात अमेरिकी पोलीसदलाकडून झालेल्या कृष्णवर्णियांच्या हत्यांनंतर या समाजातून पोलीसदलाविरोधात मोठ्या प्रमाणावर असंतोष व्यक्त झाला होता. ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ व इतर आंदोलनांमधून पोलीसदलाचा निधी कमी करण्याची तसेच पोलीस हटविण्याची आक्रमक मागणी करण्यात आली होती. शिकागोसारख्या अनेक शहरांनी पोलीसदलाचा निधी कमी करण्याचे निर्णयही घेतले होते. या निर्णर्यांमुळे पोलिसांची संख्या घटली असून त्यांच्या क्षमता तसेच अधिकारांवरही मर्यादा आल्या आहेत.

याचा परिणाम अमेरिकी शहरांच्या सुरक्षेवर होत असून प्रमुख शहरांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शहरात गस्त घालण्यासह इतर महत्त्वाच्या कामांसाठी पोलीस कमी पडत असल्याने टोळीयुद्ध व इतर हिंसक घटना वाढल्याचे सांगण्यात येते. फिलाडेल्फिया व शिकागोसह १३ प्रमुख शहरांमध्ये गेल्या वर्षी विक्रमी प्रमाणात हिंसक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. अमेरिकेत सर्वाधिक लोकसंख्या असणारे तिसरे शहर म्हणून ओळख असणार्‍या शिकागोमध्ये २०२१ साली सुमारे ८०० हत्या व साडेतीन हजारांहून अधिक शूटिंगच्या घटनांची नोंद झाली होती.

या वाढत्या हिंसक घटनांचे लक्ष्य पोलीसही बनत असून त्यामुळे पोलीसांच्या हत्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे, असे मत काही आजीमाजी अधिकार्‍यांनी व्यक्त केले. नवीन वर्षातही ऑन ड्युटी पोलीस अधिकार्‍यांना लक्ष्य करण्याच्या घटना कायम राहिल्या आहेत. २०२२ सालच्या पहिल्या दोन आठवड्यातच अमेरिकेत नऊ पोलीस अधिकार्‍यांच्या हत्या झाल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे.

leave a reply