वॉशिंग्टन – गेल्या आठवड्यात व्याजदरात केलेल्या वाढीनंतर अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह येत्या वर्षात व्याजदर अधिक वाढविण्याचा विचार करीत आहे. व्याजदरातील नव्या वाढींमुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेला मोठे धक्के बसू शकतात, असा इशारा फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी दिला. फेडरल रिझर्व्हच्या निर्णयांनंतर अमेरिकी अर्थव्यवस्था ‘सॉफ्ट लँडिंग’ करील अशा भ्रमात राहू नका, असेही पॉवेल यांनी बजावले आहे. गेल्या आठवड्यात फेडरल रिझर्व्हने केलेल्या व्याजदरवाढीवर अमेरिकी उद्योग व शेअरबाजारातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचा नवा इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.
अमेरिकेत सध्या महागाईचा भडका उडाला असून त्याचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेतील महागाई निर्देशांक ७.९ टक्क्यांवर पोहोचला असून ही गेल्या चार दशकांमधील सर्वात मोठी वाढ ठरली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून महागाई निर्देशांकात एकदाही घट झालेली नाही. नोव्हेंबर २०२० पासून सलग १४ महिने अमेरिकेतील महागाईत सातत्याने भर पडत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या अडचणी, इंधन व पोलादासह कच्च्या मालाच्या किंमतीमध्ये झालेली वाढ आणि कामगारांची टंचाई यासारखे घटक अमेरिकेतील महागाई वाढविण्यास कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येते.
महागाईचा भडका कमी करण्यासाठी फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार, गेल्या आठवड्यात अमेरिकेतील व्याजदर ०.२५ टक्क्यांनी वाढविण्यात आले. व्याजदरातील ही वाढ गेल्या तीन वर्षांमधील पहिलीच वाढ ठरली आहे. या वाढीमुळे कर्ज घेणे अधिक महागणार असून त्याचे परिणाम अमेरिकी जनतेच्या क्रयशक्तीवर होऊ शकतात. उत्पादनांची मागणी कमी होऊन जीडीपीच्या घसरणीची शक्यता आहे. पुढे याचे रुपांतर आर्थिक मंदीत होऊ शकते, असा दावा विश्लेषक तसेच अर्थतज्ज्ञांनी केला आहे.
फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांचे वक्तव्य हेच संकेत देत आहेत. पॉवेल यांनी गेल्या आठवड्यातील व्याजदरवाढीनंतर येत्या वर्षभरात सहावेळा दरवाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. तसे झाल्यास अमेरिकेतील व्याजदर दोन टक्क्यांच्या वर जाऊ शकतात. ही बाब अमेरिकी जनतेसाठी मोठा धक्का ठरुन त्यांचे ‘बजेट’ कोलमडून पडू शकते. त्याचवेळी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर मंदीचे संकटही ओढवू शकते, असा इशारा देण्यात आला आहे. अमेरिकी अर्थव्यवस्था मंदीत गेल्या त्याचे मोठे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर उमटू शकतात.