अफगाणिस्तानातील तालिबानच्या हल्ल्यांमध्ये वाढ

वॉशिंग्टन/काबुल – अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये मंगळवारी झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये तिघांचा बळी गेला. काबुलमधील या हल्ल्यावर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी टीका केली. अफगाणिस्तानच्या राजधानीमधील तालिबानच्या हल्ल्यांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तालिबानी दहशतवादी सरकारी अधिकारी व अफगाणी लष्कराला लक्ष्य करीत असल्याची माहिती अमेरिकी अभ्यासगटाने प्रसिद्ध केली आहे. दरम्यान, या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीचा निर्णय रोखून धरला आहे. नाटोने देखील अफगाणिस्तानातून पूर्ण माघार शक्य नसल्याचे ठासून सांगितले आहे.

मंगळवारी राजधानी काबुलमध्ये दहशतवाद्यांनी तीन स्फोट घडविले. यात अफगाणी सरकारसंलग्न गटाच्या धार्मिक नेत्यांसह आणखी दोघांचा बळी गेला तर सात जण जखमी झाले. या स्फोटांची तीव्रता कमी होती. राजधानी काबुलमधील या हल्ल्यांसाठी तालिबान जबाबदार असल्याचा आरोप अफगाणी सुरक्षा यंत्रणा करीत आहे. सलग दुसर्‍या दिवशी काबुलमध्ये कारबॉम्बस्फोट झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून तालिबानने राजधानी काबुलमध्ये हल्ले घडविले आहेत. ‘स्पेशल इन्स्पेक्टर जनरल फॉर अफगाणिस्तान रिकन्स्ट्रक्शन’ (सिगार) या अभ्यासगटाने सोमवारी एका अहवालाद्वारे ही बाब निदर्शनास आणून दिली आहे.

अमेरिका व अफगाणी सरकारच्या तालिबानशी वाटाघाटी सुरू झाल्यानंतर अफगाणिस्तानातील या हल्ल्यांची तीव्रता वाढल्याचा निष्कर्ष ‘सिगार’ने नोंदविला. गेल्या वर्षी १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर, या तीन महिन्यांच्या कालावधीत तालिबानने अफगाणिस्तानात ८१० जणांचा बळी गेला तर १,७७६ जण जखमी झाल्याचे या अभ्यासगटाने नमूद केले. त्याचबरोबर हल्ल्यांसाठी वापरलेली स्फोटके देखील आधीच्या तुलनेत अधिक प्रगत आहेत. तालिबान ‘स्टिकी बॉम्ब’ किंवा ‘मॅग्नेटिक आयईडी’चा वापर करीत असल्याचे अभ्यासगटाचे म्हणणे आहे.

तालिबानच्या या वाढत्या हल्ल्यांवर अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. तालिबानचे हे हल्ले संघर्षबंदीचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप बायडेन प्रशासनाने केला आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीच्या निर्णयावर फेरविचार करण्याची घोषणा अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने केली आहे. नाटोने देखील मे महिन्यापर्यंत अफगाणिस्तानातून कुठल्याही प्रकारे सैन्यमाघार शक्य नसल्याचे ठणकावले आहे.

leave a reply