काबुल – शनिवारी पहाटे अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या बगराम हवाईतळावर रॉकेटहल्ला झाल्याचे समोर आले आहे. कलंदरखिल गावातून हा हल्ला झाला असून सुरक्षायंत्रणांनी सहा रॉकेटस् व ट्रक ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते. हल्ल्यात कोणाचा हात आहे, याची माहिती देण्यात आली नसली तरी ‘आयएस’ने हल्ला घडविला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अमेरिका व नाटो लष्कराचे संयुक्त कमांडर जनरल स्कॉट मिलर यांनी तालिबान स्वतःच्या फायद्यासाठी हिंसाचाराचा वापर करीत असून त्यांना हिंसेचा मार्ग सोडायचाच नाही, असा ठपका ठेवला आहे.
पहाटे साडेसहाच्या सुमारास अमेरिकेच्या बगराम हवाईतळावर पाच रॉकेट्स डागण्यात आल्याची माहिती स्थानिक अधिकार्यांनी दिली. ही रॉकेट्स कलंदरखिल गावातून सोडण्यात आली असून सुरक्षायंत्रणांनी रॉकेट्स लाँच करण्यासाठी वापरलेला ट्रक ताब्यात घेतला आहे. ट्रकमध्ये अजून सात रॉकेट्स मिळाल्याचे सांगण्यात येते. नाटोनेही या रॉकेटहल्ल्याला दुजोरा दिला आहे. सध्या तरी हल्ल्यात कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नसून अमेरिका व नाटोने तळावरील हानीबाबत माहिती दिलेली नाही.
गेल्या आठ महिन्यात बगराम तळावर झालेला हा दुसरा रॉकेट हल्ला आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात ‘आयएस’ने बगराम तळावर पाच रॉकेट्स डागली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी राजधानी काबुलमध्येही रॉकेट हल्ले चढविण्यात आले होते. काबुलमधील हल्ल्यात एक बळी गेला होता तर अनेक जण जखमी झाले होते.
दरम्यान, शुक्रवारी गझनी प्रांतात झालेल्या बॉम्बस्फोटात १५ जणांचा बळी गेला असून २०हून अधिक जखमी झाले आहेत. बळींमध्ये १२ मुलांचा समावेश आहे. दुपारी दोनच्या सुमारास गिलान जिल्ह्यातील एका घराजवळ स्फोटकांनी भरलेल्या मोटरबाईकचा स्फोट घडविण्यात आला. स्फोटाच्या वेळेस घरानजिक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र गझनीत तालिबानचा प्रभाव असून त्यांनी हा स्फोट घडविल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल गनी यांनी गझनीतील स्फोटाची निंदा करीत तालिबानवर टीकास्त्र सोडले आहे.
‘अफगाणिस्तानमधील जनतेला संघर्षबंदी हवी आहे, ही गोष्ट आता तालिबानने स्वीकारायला हवी. अफगाणी जनतेवर दहशतवादी हल्ले चढविणे तालिबानने थांबवायलाच हवे. हे हल्ले मानवतेविरोधात असून तालिबानने शांतीप्रक्रिया मान्य करणे गरजेचे आहे’, असे राष्ट्राध्यक्ष गनी यांनी बजावले. संयुक्त राष्ट्रसंघातील अफगाणिस्तानच्या राजदूत अदेला राझ यांनी अफगाणिस्तानातील वास्तविकतेकडे दुर्लक्ष करून तालिबानवरील निर्बंध शिथिल केले तर ते या देशातील शांततेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांसाठी प्रतिकूल आणि हानिकारक ठरेल, असा इशारा नुकताच दिला होता. अमेरिका व नाटो लष्कराचे प्रमुख जनरल मिलर यांनीही नाराजी व्यक्त केली असून, तालिबान शांतीप्रक्रियेत फायदा मिळावा म्हणून हिंसेचा वापर करीत आहे, या शब्दात फटकारले आहे.
गझनीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर अफगाणी सुरक्षादलांनी तीन प्रांतांमध्ये तालिबानविरोधात मोठी कारवाई केल्याची माहिती दिली. झाबुल, कंदाहार व उरुझ्गान प्रांतात ‘अफगाणिस्तान नॅशनल डिफेन्स अॅण्ड सिक्युरिटी फोर्सेस’ केलेल्या कारवाईत ४७ तालिबानी दहशतवादी ठार झाले आहेत. या मोहिमेत अनेक दहशतवादी जखमी झाले असून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा ताब्यात घेतल्याचेही सांगण्यात आले.