गाझापट्टीतून इस्रायलवर १०४ रॉकेट हल्ले

- इस्रायलच्या कारवाईत इस्लामिक जिहादचा दहशतवादी ठार

जेरूसलेम – इस्रायलच्या कोठडीत उपोषण करणाऱ्या इस्लामिक जिहादच्या दहशतवाद्याचा मृत्यू झाल्यानंतर गाझापट्टीतून इस्रायलवर तब्बल १०४ रॉकेट्सचे हल्ले झाले. यामध्ये तीन नागरिक जखमी झाल्यानंतर खवळलेल्या इस्रायलने गाझातील हमास व इस्लामिक जिहादच्या १६ ठिकाणांवर जबरदस्त हवाई हल्ले चढविले. यात इस्लामिक जिहादचा दहशतवादी मारला गेला. यानंतर हमासने संघर्षबंदीची घोषणा केली खरी, पण गाझातील दहशतवादी संघटनांच्या संघर्षबंदीवर आपला विश्वास नसल्याचे इस्रायलने म्हटले आहे. यापुढे इस्रायलवर रॉकेट हल्ल्यांची चूक केली तर त्याला अधिक जोरदार प्रत्युत्तर मिळेल, असा इशारा इस्रायलच्या संरक्षणदलाने दिला आहे.

गाझापट्टीतून इस्रायलवर १०४ रॉकेट हल्ले - इस्रायलच्या कारवाईत इस्लामिक जिहादचा दहशतवादी ठारगेल्या ८७ दिवसांपासून इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनेचा मोठा कमांडर शेख खादेर अदनान इस्रायलच्या कोठडीत होता. दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा आरोप असलेल्या अदनानला लवकरच शिक्षा सुनाविण्यात येणार होती. गेली दहा वर्षे एकूण १३वेळा वेगवेगळ्या दहशतवादी कारवायांसाठी अदनानला अटक करण्यात आली होती. मात्र यावेळी अदनान याने इस्रायलच्या कोठडीतील आपल्या साथीदारांसाठी उपोषण सुरू केले होते.

मंगळवारी अदनान बेशुद्धावस्थेत सापडल्यानंतर इस्रायली जवानांनी त्याला ‘सीपीआर’ अर्थात कृत्रिम श्वासोच्छवास दिला. तसेच त्याला तातडीने रुग्णालयातही दाखल केले. पण तोपर्यंत अदनान ठार झाला होता. इस्रायलच्या यंत्रणांनी त्याच्या मृत्यूची चौकशीचे आदेश दिले. मात्र इस्रायलच्या कोठडीत आपल्या कमांडरचा बळी गेल्याचा आरोप करून बुधवारी रात्री गाझापट्टीतून इस्लामिक जिहाद तसेच हमासच्या दहशतवाद्यांनी जोरदार रॉकेट हल्ले चढविले.

इस्रायलच्या संरक्षणदलाने दिलेल्या माहितीनुसार, गाझातून एकूण १०४ रॉकेट इस्रायलच्या दिशेने झेपावले. यातील २४ रॉकेट्स आयर्न डोमने हवेतच यशस्वीरित्या भेदले. तर ४८ रॉकेट्स इस्रायलमधील मोकळ्या जागेत कोसळले. तर १४ गाझापट्टीत आणि ११ दिशा भटकून समुद्रात कोसळले. सात रॉकेट्सबाबत माहिती नसल्याचे इस्रायली यंत्रणांनी स्पष्ट केले. यापैकी स्देरॉतमध्ये कोसळलेल्या दोन रॉकेट्सच्या हल्ल्यात तीन परदेशी नागरिक जखमी झाले. गाझापट्टीतून इस्रायलवर १०४ रॉकेट हल्ले - इस्रायलच्या कारवाईत इस्लामिक जिहादचा दहशतवादी ठारयामध्ये चिनी नागरिकाचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

गाझातील या रॉकेट हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गाझातील एकूण १६ ठिकाणांवर जबरदस्त कारवाई केली. हमास व इस्लामिक जिहादचे शस्त्रनिर्मितीचे कारखाने, इमारती, प्रशिक्षण तळ तसेच हमासच्या नौदल कमांडोज्‌‍चे ठिकाण आणि भुयारी मार्ग यांना लक्ष्य करण्यात आले. यापैकी कारखाने आणि इमारती भुईसपाट झाल्याची माहिती समोर येत आहे. इस्रायलच्या या कारवाईत इस्लामिक जिहादचा एक दहशतवादी ठार झाला असून पाच जण जखमी झाल्याचा दावा केला जातो.

यानंतर हमासने संघर्षबंदीची घोषणा केली. पण इस्रायलच्या संरक्षणदलाने ही संघर्षबंदी फेटाळली. याआधी गाझापट्टीतील दहशतवादी संघटनांनी कितीतरी वेळा संघर्षबंदी केली व त्यांनीच मोडीत काढली आहे. त्यामुळे या नव्या संघर्षबंदीवर विश्वास ठेवणार नसल्याचे इस्रायलच्या संरक्षणदलाने स्पष्ट केले. तसेच यापुढे गाझातून इस्रायलवर हल्ल्याचा प्रयत्न जरी झाला तरी त्याला याहून अधिक जोरदार प्रत्युत्तर मिळेल, असा इशारा इस्रायलने दिला. तर इस्रायलने वेस्ट बँकमधील दहशतवाद्यांवरही कारवाई सुरू केली आहे. गेल्या वर्षी इस्रायली नागरिकांची हत्या करणाऱ्या दोन दहशतवाद्यांची घरे इस्रायली संरक्षणदलाने जमिनदोस्त केली आहेत.

हिंदी

 

leave a reply