इंधन बाजारपेठेतील स्थैर्यासाठी रशियाबरोबरील ‘ओपेक प्लस’ची भूमिका महत्त्वाची -सौदी अरेबिया

रियाधOPEC – इंधन बाजारपेठेत योग्य स्थैर्य हवे असेल तर सौदी अरेबिया व रशियाने एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘ओपेक प्लस’ या गटाची भूमिका महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवायला हवे, असे सौदी अरेबियाने बजावले आहे. मंगळवारी सौदी अरेबियाच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ‘ओपेक प्लस’चा उल्लेख करण्यात आला आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय समुदायाला उद्देशून करण्यात आलेल्या आवाहनात, येमेनमधील हौथी बंडखोरांकडून सुरू असलेल्या हल्ल्यांची आठवणही करून देण्यात आली.

opec-saudi-uae-fuelयुक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेसह पाश्‍चिमात्य मित्रदेशांकडून रशियावर निर्बंधांचा मारा सुरू आहे. अमेरिका व ब्रिटनसह काही देशांनी रशियाच्या इंधनक्षेत्रावर निर्बंधही लादले आहेत. रशिया हा जगातील आघाडीचा इंधन उत्पादक देश आहे. त्यामुळे रशियावर लादलेल्या निर्बंधांचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उमटले असून कच्च्या तेलाचे दर ११५ डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. हे दर कमी करण्यासाठी अमेरिका व ब्रिटनसारखे देश ‘ओपेक’ देशांनी उत्पादन वाढवावे, असे सातत्याने सांगत आहेत.

The-role-of-OPEC-Plusमात्र ओपेक देशांनी अमेरिकेसह इतर देशांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले आहे. त्याचवेळी रशियाबरोबर असलेले संबंध व सहकार्य कायम ठेवण्यावर या देशांनी भर दिला असून सौदीचे नवे वक्तव्य त्याचाच भाग ठरते. पुढील आठवड्यात ओपेक प्लस देशांची बैठक असून त्यात इंधनाच्या उत्पादनवाढीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. रशिया व ओपेक प्लसच्या भूमिकेचा उल्लेख करून सौदीने निर्णय रशियाच्या सहमतीनेच होईल, असे स्पष्ट संकेत दिल्याचे दिसत आहे.

सौदीने रशिया व ओपेक प्लसचा केलेला उल्लेख अमेरिका तसेच युरोपिय देशांच्या इराणधार्जिण्या धोरणाला दिलेली चपराक असल्याचे मानले जात आहे. अमेरिका व युरोपिय देश अणुकरारासाठी इराणला अनेक सवलती देण्याची तयारी करीत असून सौदी व इतर आखाती देशांना वाटणार्‍या चिंतांकडे दुर्लक्ष करीत आहेत. अशा वेळी इंधनक्षेत्रातील आपल्या प्रभावाचा वापर करून सौदी व मित्रदेश त्याला प्रत्युत्तर देत असल्याचे दिसत आहे.

leave a reply