रशियाबरोबरील धोरणात्मक भागीदारीची मुळे खोलवर रुजलेली आहेत

- भारताच्या परराष्ट्र सचिवांची ग्वाही

मॉस्को – ‘भारत व रशियामधील धोरणात्मक भागीदारीची मुळे खोलवर रुजलेली आहेत. त्या आधारावर सध्या जगात निर्माण झालेल्या गुंतागुंतीच्या स्थितीतून सहज बाहेर पडता येईल’, असा विश्‍वास भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रिंगला यांनी व्यक्त केला. यांचा दोन दिवसांचा रशिया दौरा नुकताच पार पडला असून, यादरम्यान त्यांनी रशियातील अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांच्या भेटी घेतल्या. या भेटींमध्ये भारत व रशियामधील संबंध अधिक दृढ करण्याच्या हेतूने महत्त्वपूर्ण मुद्यांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.

2021 साली भारत आणि रशियाचे सर्वच पातळ्यावरील सहकार्य अधिकच दृढ होईल, असा विश्‍वास रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी गेल्या वर्षाच्या अखेरीस व्यक्त केला होता. या वक्तव्याच्या पार्श्‍वभूमीवर भारताच्या परराष्ट्र सचिवांचा रशिया दौरा महत्त्वाचा मानला जातो. गेल्या काही वर्षात चीनचा वाढता धोका लक्षात घेता, भारत व अमेरिकेमधील जवळीक वाढत असल्याचे दावे करण्यात येत होते. रशियन परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह व इतर नेत्यांकडून यावर नाराजीचा सूर लावण्यात आला होता.

मात्र भारताने रशियाबरोबरील आपल्या ऐतिहासिक संबंधांचा दाखला देऊन त्यात बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. परराष्ट्र सचिव श्रिंगला यांनी रशियन दैनिक ‘कॉमरसँट’ला दिलेल्या मुलाखतीतही या मुद्यावर भर दिला. ‘कॉमरसँट’ने भारताच्या परराष्ट्र सचिवांना ‘एस-400’ क्षेपणास्त्र यंत्रणेच्या मुद्यावर प्रश्‍न विचारला. त्यावर उत्तर देताना भारताचे, अमेरिका व रशिया या दोन्ही देशांबरोबर असलेले संबंध त्या त्या पातळीवर मजबूत असून त्यात कोणताही फरक पडणार नसल्याचे श्रिंगला यांनी स्पष्ट केले. जगातील सर्व प्रमुख देशांनी भारताचे परराष्ट्र धोरण स्वतंत्र असल्याचे व ती भारताची परंपरा असल्याचे मान्य केले आहे, याकडे परराष्ट्र सचिवांनी लक्ष वेधले.

‘मला कोणत्याही विशिष्ट संरक्षण कराराबाबत प्रतिक्रिया द्यायची नाही. मात्र रशियाबरोबर झालेल्या सर्व करारांची अंमलबजावणी नियोजित वेळेत होईल, याची मी खात्री देऊ शकतो. ही गोष्ट भारताच्या संरक्षण तसेच सुरक्षाविषयक गरजा आणि हितसंबंधांशी सुसंगत आहे’, असे परराष्ट्र सचिव श्रिंगला यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी भारत व रशियामधील 2020 सालची वार्षिक बैठक रद्द होण्यामागे कोरोनाची साथ हेच कारण होते, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला.

‘एस-400’ संरक्षणयंत्रणेचा मुद्यावरून अमेरिकेने भारतावर दडपण आणण्याचे प्रयत्न केल्याचे वृत्त यापूर्वी प्रसिद्ध झाले होते. मात्र भारताने आपली भूमिका स्पष्ट करून रशियाबरोबरील करारात बदल होणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आहे.

leave a reply