श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये राष्ट्रीय महामार्गावर लढाऊ विमानांसाठी धावपट्टी उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. चीन लडाखनजीकच्या सीमाभागात धावपट्टी उभारत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. तसेच भारतीय सीमेजवळून लढाऊ विमानाचे उड्डाण करून चीनने भारताला युद्धाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये सुरु झालेल्या या धावपट्टीच्या कामाचे महत्व वाढले आहे. भविष्यात पश्चिम आणि पूर्व सीमेवर आपत्कालीन परिस्थिती उदभविल्यास ही धावपट्टी महत्वाची सिद्ध ठरेल. काश्मीर खोऱ्यात महामार्गावर उभारण्यात आलेली ही तिसरी धावपट्टी आहे.
दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात बिजबेहरा भागाजवळ श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर लढाऊ विमानांच्या उड्डाण व लँडिंगसाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचएआय) धावपट्टी उभारण्यात येत आहे. ३.५ किलोमीटर लांबीची ही धावपट्टी पीओकेपासून जवळ असली, तरी लडाखमधील भारत आणि चीन सीमाही फारशी लांब नाही. त्यामुळे लडाखमध्ये सध्या सुरु असलेल्या तणावाशी या धावपट्टीला जोडून पाहण्यात येत आहे. धावपट्टीचा चीन बरोबर सुरु असलेल्या संघर्षाशी काहीही संबंध नसून यापूर्वीच या योजनेस मंजुरी देण्यात आली होती असा खुलासा वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. कोरोनाव्हायरस फैलाव होण्यास सुरुवात झाल्यामुळे देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे धावपट्टीचे काम पुढे ढकलण्यात आले होते, असा दावा या अधिकाऱ्याने केला.
काश्मीर खोऱ्यात महामार्गावर उभारण्यात आलेली ही तिसरी धावपट्टी आहे. याआधी अवंतीपोरा आणि श्रीनगरमध्ये अशा प्रकारची धावपट्ट्या उभारण्यात आल्या आहेत.युद्धकाळात शत्रूच्या हल्ल्यात धावपट्ट्या खराब झाल्यास लढाऊ विमानांच्या आणि मालवाहू विमानाच्या उड्डाणा व लँडिंगमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच रसद पुरवठ्यात अडथळे येऊ शकतात. अशा परिस्थितीत चीन व पाकिस्तानच्या सीमेवर येणारी ही धावपट्टी उपयुक्त ठरू शकते.
भारतीय वायुसेनेने आपत्कालीन वेळेत लढाऊ विमाने उतरवता येवू शकतील अशा २१ महामार्गाची निवड करून ठेवली आहे. या महामार्गांमधे मुंबई नाशिक महामार्गाचा देखील समावेश आहे. यापूर्वी मथुरेजवळील यमुना एक्सप्रेसवर मिराज या लढाऊ विमानाचे यशस्वी लँडिंग केले होते. यासह मिराज-२००० व सुखोई-३० या लढाऊ विमानांनी आग्रा-लखनऊ एक्स्प्रेसवेवर लँडिंग करत धावपट्टीवर न थांबता पुन्हा टेकऑफ केले होते. तर जुहू विमानतळावर हवाई दलाचे मालवाहू विमान उतरविण्यात आले होते.
अमेरिका, कोरिया, फिनलंड, स्वित्झर्लंड, पोलंड व पाकिस्तानातसह अन्य काही देशात महामार्गावर अशा प्रकारचा प्रयोग करण्यात आला आहे. मात्र मागील काही वर्षात भारतानेही पाकिस्तान आणि चीन सीमेवरील आव्हाने पाहता आपल्या महामार्गांवर आपत्कालीन धावपट्टी उभारण्यास सुरुवात केली असून दक्षिण काश्मीरमध्ये अनंतनागमध्ये सुरु असलेली धावपट्टी याचाच भाग ठरतो.