काबूल – इंधन आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यासंदर्भात रशिया आणि अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीमध्ये सहकार्य प्रस्थापित झाले आहे. अफगाणिस्तानातील रशियाचे राजदूत झामीर काबुलोव्ह यांनी ही माहिती दिली.
काही दिवसांपूर्वीच तालिबानच्या एका मंत्र्याने आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेशी बोलताना रशियाबरोबर मोठ्या प्रमाणात इंधनविषयक सहकार्य प्रस्थापित झाल्याचे सांगितले होते. याअंतर्गत रशिया अफगाणिस्तानला इंधन, नैसर्गिक वायू आणि गव्हाचा पुरवठा करणार असल्याची माहिती या तालिबानच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. रशिया अफगाणिस्तानला पाच लाख टन नैसर्गिक वायूचा पुरवठा करणार असल्याचे दावे केले जात होते.
रशियाचे अफगाणिस्तानातील राजदूत काबुलोव्ह यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना या बातमीला दुजोरा दिला. जगातील कुठल्याही देशाने अफगाणिस्तानातील तालिबानचा राजवटीला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे अफगाणिस्तानला आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळणे अवघड होऊन बसले आहे. अशा परिस्थितीत रशियाने अफगाणिस्तानबरोबर केलेले हे सहकार्य अतिशय महत्त्वाचे ठरते.