रशिया-युक्रेन संघर्ष रोखण्यासाठी रशियालाही सुरक्षेची हमी देणे आवश्यक

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन

emmanuel-macronपॅरिस/मॉस्को – ‘रशिया-युक्रेन युद्धात शांतता वाटाघाटींच्या मार्गानेच मिळेल. त्यासाठी युक्रेनला दीर्घकालिन सुरक्षा व भौगलिक सार्वभौमत्वाची खात्री मिळायला हवी. पण त्याचवेळी रशिया हादेखील संघर्षबंदी व शांतीचर्चेचा भाग असणार आहे हे ध्यानात घेऊन त्या देशालाही सुरक्षेची हमी द्यायला हवी’, अशी आग्रही भूमिका फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मांडली. फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी रशियाच्या सुरक्षा हमीचा मुद्दा उपस्थित करण्याची ही दुसरी वेळ ठरते.

russia putinकाही आठवड्यांपूर्वी नाटोला उद्देशून केलेल्या एका वक्तव्यात फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी, भविष्यातील युरोपच्या सुरक्षेची आखणी करताना नाटोने रशियाला सुरक्षाविषयक हमी द्यायला हवी, असा सल्ला दिला होता. मॅक्रॉन यांच्या या सल्ल्यापूर्वी जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांनी भविष्यात क्षेपणास्त्र तैनाती, सुरक्षा व इतर संरक्षणविषयक मुद्यांवर रशियाशी नव्याने चर्चा केली जाईल, असे वक्तव्य केले होते. एकापाठोपाठ आलेल्या या वक्तव्यांनंतर, युरोपिय देश रशिया-युक्रेनदरम्यान शांतीचर्चा व्हावी, यासाठी उत्सुक असल्याचे संकेत मिळत असल्याचा दावा विश्लेषकांनी केला होता.

रशिया-युक्रेन युद्ध सुरू होण्यापूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनसह अमेरिका व नाटोला सुरक्षाविषयक हमी मागणारा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी, नाटोचा विस्तार थांबवावा व युक्रेनला नाटोचे सदस्यत्व देऊ नये, अशी मागणी केली होती. मात्र युक्रेनसह पाश्चिमात्य आघाडीने हा प्रस्ताव फेटाळला होता. युद्ध सुरू झाल्यानंतरच्या शांतीचर्चेतही रशियाकडून या प्रस्तावाचा उल्लेख करण्यात आला होता.

leave a reply